Kokan News – सांगवे ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम, ‘नाम फाउंडेशन’ पुढाकाराने सप्तलिंगी नदीचे पुनरुज्जीवन; भास्कर शेलार यांचे सहकार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“जल हेच जीवन आणि पाणी हीच समृद्धी” हा मंत्र जपत, सांगवे गावातील ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. गावातील सप्तलिंगी नदीचा गाळ उपसून आणि अडथळे दूर करून नदीला पुनर्जीवित करण्याच्या भव्य अभियानाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात करण्यात आला.

हे कार्य ‘नाम फाउंडेशन’ आणि सांगवे गावातील ज्येष्ठ नागरिक भास्कर महादेव शेलार यांच्या विशेष सहकार्यातून साकार होत आहे. नदीपात्रातील साचलेला गाळ काढणे आणि मोठे दगड बाजूला करणे, यामुळे नदीचा प्रवाह मोकळा होऊन पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. याचा थेट फायदा गावातील शेती आणि भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास होणार आहे.

या शुभप्रसंगी नाम फाउंडेशनचे समीर जानवलकर आणि भास्कर महादेव शेलार यांच्यासह गावचे प्रथम मानकरी सदानंद शेलार, उत्सव कमिटी अध्यक्ष बाळोजी शेलार, सरपंच सौ. दुर्वा ताई शेलार, पोलीस पाटील विजय शेलार, माजी सरपंच श्री. देवदत्त शेलार, विलास शेलार, माने, प्रमोद शेलार आणि गावातील इतर मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नदी स्वच्छ करणे ही केवळ आजची गरज नसून भविष्यातील पिढीसाठी केलेली गुंतवणूक आहे. भास्कर महादेव शेलार हे केवळ सांगवे गावातच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीत त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विधायक कामे मार्गी लागली आहेत. या प्रकल्पासाठी नाम फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वाची धुरा नीलकंठ भास्कर शेलार आणि संजय काशीनाथ शेलार यांनी यशस्वीपणे पेलली आहे.या उपक्रमामुळे सांगवे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, निसर्ग संवर्धनाचा एक आदर्श या निमित्ताने सर्वांसमोर उभा राहिला आहे. सांगवे ग्रामस्थांनी या कार्यासाठी नाम फाउंडेशन आणि शेलार परिवाराचे विशेष आभार मानले आहेत.