Gold, Silver Rates Today – सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीआधी तुमच्या शहरातील एक तोळ्याचा भाव जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज हिंदुस्थानी बाजारापेठेमध्ये सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलरचे वधारलेले मूल्य आणि जागतिक तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार कायम आहे.

सोमवारी बाजार उघडताच सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर बाजार उघडताच सोन्याच्या भावात प्रति तोळ्यामागे (10 ग्रॅम) 1,105 रुपये आणि चांदीच्या भावात प्रति किलो 4,912 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एकीकडे कमोडिटी बाजार आणि शेअर बाजारकोसळत असून दुसरीकडे डॉलर इंटेक्समध्ये मजबुती कायम आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 57 पैशांनी घसरून 93.30 वर उघडला. शुक्रवारी रुपया 92.73 वर बंद झाला होता.

एसीएक्सवरील सोने-चांदीचे दर

– सोने 1,105 रुपयांनी स्वस्त होऊन 1 लाख 51 हजार 547 रुपयांवर पोहोचले. मागील सत्रामध्ये बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचे दर 1 लाख 52 हजार 652 रुपये होते.

चांदी प्रति किलोमागे 4,912 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 38 हजार 362 रुपयांवर पोहोचली आहे. मागील सत्रात बाजार बंद झाला तेव्हा चांदीचे दर 2 लाख 43 हजार 274 रुपये होते.

Share Market News – इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटली, शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1600, निफ्टी 490 अंकांनी कोसळला

सोने पडण्याचे कारण

– आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर चलन वापरणाऱ्यांसाठी सोने खरेदी करणे महाग झाले आहे. परिणामी मागणी घटल्याने दर पडले आहेत.

– इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

महागाईच्या चिंतेमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी झाली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.