
प्रयागराज महाकुंभ 2025 दरम्यान चर्चेत आलेली मोनालिसा अलिकडे तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. मोनालिसा हिचे वय 18 वर्षांहून कमी असल्याचे समोर आले होते. त्यानतंर आता ती बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मोनालिसाचा पती फरमान याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याने मोनालिसा आपल्याला सोडून पळून गेल्याचा दावा केला आहे.
फरमानने या व्हिडिओत म्हटले आहे की, त्याने अजमेर आणि पुष्करमध्ये तिचा शोध घेतला, मात्र ती तिथे सापडली नाही. आता तो तिला शोधण्यासाठी जोधपूरला जात असल्याचे सांगत असून, त्याने नागरिकांना तिला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दुसरीकडे मोनालिसाच्या आईने हे सर्व दावे फेटाळून लावत फरमानवरच गंभीर आरोप केले आहेत. हा सर्व प्रकार एक सुनियोजित कट असून फरमाननेच मुलीला बेपत्ता केल्याचा आरोप मोनालिसाच्या आईने केला
महेश्वर येथील रहिवासी असलेल्या मोनालिसाच्या कुटुंबीयांनी या लग्नाबद्दल आधीच संशय व्यक्त केला होता. कायदेशीर पेच निर्माण झाल्यास मुलीचे अपहरण केले जाऊ शकते, अशी भीती त्यांना सतावत होती. मोनालिसाच्या आईने सांगितले की, सुमारे 15-20 दिवसांपूर्वी फरमानने तिला मुलीशी अगदी थोड्या वेळासाठी बोलू दिले होते. मात्र, संभाषणादरम्यानच त्याने मुलीच्या हातातील फोन हिसकावून घेतला होता, तेव्हापासून तिचा फोन बंद येत आहे. आपल्या मुलीला ओलीस ठेवण्यात आले असावे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने हस्तक्षेप केल्यानंतर एक मोठी माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान मोनालिसाची कागदपत्रे तपासली असता ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मध्य प्रदेश सरकारच्या निर्देशानुसार महेश्वर पोलीस ठाण्यात फरमानविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा तपास जसा तीव्र झाला, तसाच फरमानचा हा व्हिडिओ समोर आल्याने संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. या घटनेमुळे महेश्वर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस आता मोनालिसाचा शोध घेण्यासोबतच या व्हिडिओमागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.


























































