
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा स्पाय-ॲक्शन चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रदर्शनाच्या 25 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या रविवारी चित्रपटाने 14.75 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, याद्वारे चौथ्या वीकेंडअखेर या चित्रपटाने जगभरात 1,712.98 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे आखाती देश आणि चीनसारख्या मोठ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होताही इतकी प्रचंड कमाई करणारा हा पहिलाच हिंदुस्थानी चित्रपट ठरला आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत या चित्रपटाने आतापर्यंत 1,083.67 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात 674.17 कोटींचा विक्रमी व्यवसाय केल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अनुक्रमे 263.65 कोटी आणि 110.60 कोटी रुपयांची कमाई झाली. चौथ्या आठवड्यात 35.25 कोटींचा गल्ला जमवत या चित्रपटाने ‘जवान’ला मागे टाकले असून सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. आता या चित्रपटाची स्पर्धा ‘स्त्री 2’, ‘छावा’ आणि ‘पुष्पा 2: द रूल’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांशी आहे.
‘धुरंधर 2’ ने जरी त्याच्या पहिल्या भागाचा म्हणजेच ‘धुरंधर’चा 58 कोटींचा चौथ्या वीकेंडचा विक्रम मोडला नसला, तरी ‘धुरंधर’ फ्रँचायझीने एकत्रितपणे 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. हिंदी भाषिक बाजारपेठ हे या चित्रपटाच्या यशाचे मुख्य केंद्र राहिले असून, उत्तर अमेरिका आणि ब्रिटनमध्येही याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
सध्या हा चित्रपट ‘पुष्पा 2: द रूल’च्या 1,742 कोटी रुपयांच्या लाईफटाईम कलेक्शनच्या अगदी जवळ पोहोचला आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, अवघ्या 30 कोटी रुपयांचा फरक असल्याने येत्या काही दिवसांत ‘धुरंधर 2’ हा टप्पा सहज पार करेल आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदुस्थानी चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेईल. मात्र, 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे ‘धुरंधर 2’ समोर बॉक्स ऑफिसवर पहिले मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.



























































