
‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण) सुधारणा विधेयकासाठी केंद्र सरकारने 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. पश्चिम बंगाल व तामीळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दोन राज्यांत निवडणुका असताना केंद्र सरकारकडून महिला आरक्षणाचं बिल आणून त्याचं श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
”महिला आरक्षणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना पत्र लिहले आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा पाच राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्याचवेळी तुम्ही या विधेयकासाठी विशेष अधिवेशन घेत आहात. आमच्या विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना निवडणुकीनंतर सर्वपक्षीय बैठक बोलवा, २९ एप्रिलनंतर कधीही बैठक घ्या, त्यावर चर्चा करा, मग आपण ठरवू असे कळवले आहे. पण त्यांना निवडणुकीत त्याचं श्रेय घ्यायचं आहे. आम्ही हे करून दाखवलं असं त्यांना दाखवायचं आहे. हा जो काही राजकीय खेळ सुरू आहे आम्ही त्याला विरोध करत आहोत. भाजपची लोकं देखील याला विरोध करत आहेत. पण बोलू शकत नाहीये”, असे संजय राऊत यांनी ANI शी बोलताना सांगितले.

























































