
दिल्लीत दंगलीचा कट रचल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या उमर खालिद याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. खालिद याला 5 जानेवारी रोजी न्यायालयाने जामीन नाकारला होता. या निर्णयाचा न्यायालयाने फेरविचार करण्याची मागणी खालिद याने केली आहे. या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.
यूएपीए कायद्यांतर्गत खालिद आणि इमाम या दोघांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता. नियोजन, जमाव जमवणे आणि त्यांना मार्गदर्शन यामध्ये खालिद आणि इमाम या दोघांची महत्त्वाची भूमिका असल्याचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने म्हटले होते.
उमर खालिद यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. या याचिकेवर ओपन कोर्टमध्ये चर्चा व्हावी, अशी विनंती सिब्बल यांनी केली आहे. न्यायालयाने यावर आपले उत्तर दिले. आम्ही कागदपत्रे पाहू आणि गरज भासल्यास तसा निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणातील अन्य आरोपी गुलफिशा फातिमा, मीरा हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शादाब अहमद यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, खालिद आणि इमाम एका वर्षांनंतर किंवा संरक्षित साक्षीदारांच्या तपासणीनंतरच पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतील अशी अट न्यायालयाने घातली आहे. बुधवारी होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































