होर्मुझची नाकेबंदीची घोषणा करणाऱ्या ट्रम्प यांना धक्का; आम्ही युद्धात ओढले जाणार नाही,ब्रिटनची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझ हा सर्वात संवेदनशील मुद्दा ठरत आहे. आता या सामुद्रधुनीबाबत एक नवीन वळण आले आहे. एकीकडे अमेरिका हा महत्त्वाचा सागरी मार्ग रोखण्याची तयारी करत असताना, दुसरीकडे त्यांचा सर्वात जवळचा मित्र देश असलेल्या ब्रिटनने अमेरिकेच्या या भूमिकेपासून वेगळे होण्याचे मत व्यक्त केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा देश या नाकेबंदीला पाठिंबा देणार नाही किंवा इराणविरुद्धच्या कोणत्याही युद्धाचा भाग बनणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत युद्धात ओढले जाणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांना मोा धक्का बसला आहे.

अमेरिकेच्या होर्मुझ सामुद्रधुनी नाकेबंदी योजनेला मोठा धक्का बसला आहे. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा देश या कृतीला पाठिंबा देणार नाही. त्यांनी सांगितले की, ब्रिटनचे लक्ष केवळ सामुद्रधुनी खुली करण्यावर आहे आणि ब्रिटन युद्धात सामील होणार नाही. याआधी ट्रम्प म्हणाले होते की, होर्मुझ सामुद्रधुनीच्या बाबतीत मित्रराष्ट्रे देखील अमेरिकेसोबत आहेत. आता ब्रिटनच्या भूमिकेमुळे त्यांना धक्का बसला आहे.

आम्ही या नाकेबंदीला पाठिंबा देत नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे स्टारमर यांनी स्पष्ट केले. कीर स्टारमर यांनी हेही स्पष्ट केले की, ब्रिटनवर कितीही दबाव आला तरी, कोणत्याही परिस्थितीत या युद्धात ओढले जाणार नाही. कोणत्याही लष्करी कारवाईसाठी स्पष्ट कायदेशीर आधार आणि ठोस रणनीती आवश्यक असते, ज्याचा सध्या अभाव आहे.

स्टारमर यांनी सांगितले की, ब्रिटनकडे सुरुंगशोधक जहाजे आहेत, परंतु त्यांचा उद्देश कोणत्याही लष्करी संघर्षात सामील होण्याचा नसून सागरी मार्ग सुरक्षित आणि खुले ठेवण्याचा आहे. ब्रिटनचे लक्ष आक्रमक कारवाईवर नसून मुत्सद्देगिरी आणि स्थिरतेवर आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने इशारा दिला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ येणारे कोणतेही लष्करी जहाज हे शस्त्रसंधीचे उल्लंघन मानले जाईल आणि त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल. इराणच्या लष्करी प्रवक्त्याने तर असेही म्हटले आहे की, अमेरिकेची ही कृती म्हणजे “समुद्री चाचेगिरी” आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. या सर्व घडामोडींवरून हा तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.