Chhatrapati Sambhajinagar – आत्महत्येचे ‘स्टेटस’ ठेवून महिला पोलीस गायब! अख्खे पोलीस दल कामाला; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समुपदेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका चार ओळीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने अख्ख्या पोलीस दलाला कामाला लावले. ‘वरिष्ठांनी मानसिक खच्चीकरण करून आत्महत्येस प्रवृत्त केले’ अशा आशयाचे स्टेटस ठेवून एक महिला पोलीस गायब झाली. स्टेटस वाचून पोलीस दलात एकच खळबळ उडाली. शोधाशोध केल्यानंतर ती महिला सापडली. वरिष्ठांनीच समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.

हेड कॉन्स्टेबल असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याची अलिकडेच स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली. तिच्यावर स्वतंत्र बीटची जबाबदारीही देण्यात आली. काम सुरळीत चालू असतानाच तिच्या कामात ढवळाढवळ सुरू झाली. चार वेळा तिचे काम बदलण्यात आले. यासंदर्भात विचारणा करताच तिला दरडावण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांसमोर तिचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला. यामुळे महिलेची मानसिक स्थिती बिघडली.

पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी दिलेल्या त्रासामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले असून माझी चुकी नसताना मला जाणून बुजून त्रास देऊन अधिकाराचा गैरवापर करून करून मला आत्महत्यास प्रवृत्त केलेले आहे.

आज सकाळी आपल्या मोबाईलवर ‘वरिष्ठांनी दिलेल्या त्रासामुळे आपले मानसिक खच्चीकरण झाले आहे. माझी चुक नसताना अधिकाराचा गैरवापर करून मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे’ अशा आशयाचे स्टेटस ही महिला कर्मचारी गायब झाली. हे स्टेटस पाहताच पोलीस दल हादरून गेले. अख्खे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय त्या महिलेच्या शोधासाठी कामाला लागले. अखेर ती सापडली. वरिष्ठांनी समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.

सखोल चौकशी होईल

प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून त्या महिला कर्मचाऱ्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. तिला तणावाबाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तिच्या तक्रारीचीही चौकशी करण्यात येईल.

– डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस अधीक्षक

विनयभंगाची तक्रार देण्यासाठी गेली होती…

काही दिवसांपूर्वी वरिष्ठाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी ही महिला कर्मचारी सिडको पोलीस ठाण्यात गेली होती. महिला कर्मचारी तक्रार देण्यासाठी आल्याचे कळताच तिची समजूत घालून तिला परत पाठवण्यात आले.