ग्रामपंचायतीने बिल थकल्याने महावितरणाने वीज कापली, खोडळा बाजारपेठ अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोखाडा तालुक्यातील सर्वात मोठी मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडळा ग्रामपंचायतीमधील पथदिव्यांचे सुमारे चार लाख 58 हजारांचे वीज बिल थकले आहे. वारंवार मागणी करूनही वीज बिल भरले न गेल्याने महावितरणाने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून खोडळा बाजारपेठ अंधारात बुडाली आहे. ग्रामपंचायतीच्या या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मोखाडा तालुक्यातील खोडळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मोखाडा नगरपंचायत झाल्यानंतर उरलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आहे आणि खोडळा या दोन्ही ग्रामपंचायत अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र सध्या खोडळा ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल न भरल्याने महावितरणाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पंचायत समिती पैसे देऊ शकत नाही

पंचायत समितीकडे स्वतःचा निधी नसल्याने याबाबत पंचायत समिती हे पैसे देऊ शकत नाही. मात्र याबाबत आम्ही जिल्हा परिषदेकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रव्यवहार केलेला आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीने सक्षम होणे गरजेचे असून यासाठीच्या आवश्यक निधीची तरतूद कशी करता येईल याबाबतदेखील आम्ही विचार करत आहोत, अशी माहिती प्रभारी गटविकास अधिकारी अक्षय पवार यांनी दिली आहे.

अनेक वेळा नोटीस देऊनही खोडळा ग्रामपंचायतीकडून ही थकबाकी भरली नसल्याने महावितरणाकडून हा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे खोडळा बाजारपेठ अंधारात गेल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि तेथील लोकप्रतिनिधी नेमके काय करतात, असा संतप्त सवाल खोडळावासीयांनी केला आहे.

दोन लाखांच्या आसपास वीज बिल थकले आहे. या अगोदर जिल्हा परिषदेकडून हे बिल भरले जात होते. मात्र आता ते देण्यात आले नाही. यामुळे आमच्या वित्त आयोगाच्या निधीतून भरता येईल का याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी देविदास दोदे यांनी व्यक्त केली आहे.