
शीव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे दोन्ही गर्डर 31 मेपर्यंत बसवा आणि 15 जुलैपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करा, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये शीव उड्डाण पुलाचा पहिला गर्डर बसवण्यास विलंब झाला असला तरी नियोजनबद्ध पद्धतीने पुलाचे काम पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी दिले. काम वेळेत होण्यासाठी महानगरपालिका पूल विभाग आणि रेल्वे विभागांनी परस्पर समन्वय ठेवा, असेही त्या म्हणाल्या. शीव पूर्व येथे 27 क्रमांकाच्या रस्त्यावर मुख्य वाहतुकीच्या भागाचे काँक्रिटीकरण काम आणि रस्ता क्रमांक 25 (सी) येथील फुटपाथ कामांची गुणवत्ता राखा, असेही त्यांनी सांगितले. 30 एप्रिलनंतर कोणतेही खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्याची कामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.






























































