सांगली जिल्ह्यात कारखाने वाढले; ऊस घटला! यंदा सव्वा लाख हेक्टरवर लागवड, आडसाली लागणीत घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला उसाचे आगार मानले जाते. सांगलीत सध्या सहकारी आणि खासगी मिळून तब्बल 18 साखर कारखाने आहेत. गेल्या काही वर्षांत उसाचे क्षेत्र वाढल्याने कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली. आता ऊस क्षेत्रात घट होत असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात एक लाख 23 हजार 551 हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड वाळवा तालुक्यात झाली आहे. गतवर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाल्याने आडसाली हंगामातील उसाचे क्षेत्र घटले आहे. आडसाली हंगामाऐवजी पूर्व, सुरु हंगामाकडे कल वाढला आहे.

सांगली जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांचे मोठे जाळे होते. मात्र, कालांतराने सहकारी कारखाने अडचणीत आले. ते खासगी संस्थांच्या ताब्यात गेले, मात्र कारखाने कायम राहिले. सहकारी कारखान्यांच्या स्पर्धेत खासगी कारखान्यांनी जिल्ह्यात बस्तान बसविले आहे. गेल्या दोन वर्षांत कारखान्यांची स्पर्धा सुरु असल्याचे चित्र पाहिले. जिल्ह्यात सध्या सहकारी आणि खासगी मिळून 18 साखर कारखाने आहेत. चार वर्षांपूर्वी उसाचे क्षेत्र वाढत चालल्याने कारखान्यांकडून गाळप क्षमताही वाढविली आहे. गेल्या दोन वर्षांत सातत्याने उसाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र दिसून येते.

यंदा जिल्ह्यात एक लाख 23 हजार 551 हेक्टरवर उसाची लागवड आहे. त्यामध्ये आडसाली उसाचे क्षेत्र 36,088 हेक्टर, पूर्व हंगाम 23,095 हेक्टर, सुरु हंगाम 21,685 हेक्टर, तर खोडवा उसाचे क्षेत्र 42,683 हेक्टर इतके आहे. गतवर्षी जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका आडसाली हंगामातील ऊस लागवडीला बसला. त्यामुळे यंदाच्या हंगामात आडसाली उसाचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्टय़ातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर या तालुक्यांत शेतकरी पारंपरिकरीत्या पूर्व व सुरु हंगामातील उसालाच प्राधान्य देतात. जत तालुक्यात यंदा पूर्व हंगामातील लागवड कमी झाली. तर सुरु हंगामातील क्षेत्र वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उष्णता वाढू लागली आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होत आहे. यामुळे दुष्काळी भागात पाणी टंचाईची झळ बसू लागली असल्याचे चित्र आहे.

सन 2026-27 मध्ये एक लाख 23 हजार 551 हेक्टरवरील उसाचे गाळप होईल, असे चित्र दिसून येते. दुष्काळी भागातही सिंचन योजनांचे पाणी पोहोचले आहे, त्यामुळे साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. परंतु गतवर्षी पावसाचा फटका बसल्याने उसाचे क्षेत्र कमी झाल्याने कारखान्यांमध्ये ऊसासाठी स्पर्धा निर्माण होण्याची संकेत आहेत.

ऊस लागवडीचे

क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका एकूण

मिरज 15,337

जत 13,765

खानापूर 9,886

वाळवा 26,603

तासगाव 10,003

शिराळा 11,180

आटपाडी 3,800

क.महांकाळ 7,022

पलूस 14,198

कडेगाव 11,758

एकूण 1,23,551