
>> वर्णिका काकडे
दक्खनी ही मध्ययुगीन काळात म्हणजेच 14 व्या शतकात उदयाला आलेली भाषा जी मराठी, उर्दू, हिंदी, फारसी आणि तेलुगू-कानडीच्या मिश्रणातून बनलेली बोलीभाषा आहे. याला ‘कदीम उर्दू’ (जुनी उर्दू) किंवा दक्खनी हिंदी असेही म्हणतात. महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेशात प्रामुख्याने मुस्लिम समाजाची ही बोलीभाषा आहे. या भाषेवर मराठीचा प्रचंड प्रभाव आहे. दखनीला उर्दूची पूर्वज किंवा जुने स्वरूप मानले जाते.
मध्ययुगीन काळात दखनी भाषेत खूप मोठी साहित्य निर्मिती झाली आहे. सुफी संत, राजदरबारातील काही कवी आणि मुहम्मद कुली कुतुबशाह व इब्राहीम आदिलशहा या कवींनी दखनी भाषेत आपले साहित्य लिहिले आहे. काही मराठी संतानी दखनी भाषेत पण देवनागरी लिपीत लिखाण केले आहे. महाराष्ट्रातील व तेलंगनामधील मुसलमानांची दखनी ही प्रमुख बोली भाषा मानली जाते. मूळात दखनी हिंदी हे हिंदीचे जूने स्वरूप आहे.
भाषा अभ्यासक डॉ. श्रीधर कुलकर्णी यांनी अनेक पुरावे देऊन हे सिद्ध केले आहे की दखनीचा जन्म सिद्धनाथ, सुफी व बैरागी यांच्या समन्वयात्मक संस्कृतीतून दक्षिणेत झालेला आहे. कुलकर्णी यांच्या मते ’दखनी ही स्वतंत्र वेगळी भाषा असून तिचे मूळ नाथपंथाच्या बैरागी भाषेत आहे.
दखनी भाषेतील साहित्य प्रामुख्याने (फारसी लिपीत लिहिलेले ) गोवळकोंडा (कुतुबशाही ) आणि विजापूर (आदिलशाही ) या परिसरात आणि राजवटीत मोठय़ा प्रमाणात निर्माण झाले. देवनागरीत दखनी कविता प्रथम संत नामदेव (13वे शतक) यांनी लिहिल्याची माहिती आहे. तर 15व्या शतकातील निजामी या कवीने ती प्रथम फारसीत लिहिली. विजापूर आणि गोवळकोंडा राज्यात दखनीला राजभाषेचा दर्जा होता. मराठवाडय़ाचे कवी डी.के. शेख यांच्या मते इ.स. 1600 ते 1700 हा काळ दखनी काव्याचे सुवर्णयुग होते.
सुफी संत आणि आदिलशाही-कुतुबशाहीच्या राजदरबारात या भाषेचा वापर व्हायचा. संत नामदेवांनीही दखनीमध्ये कविता लिहिल्या आहेत. कवी वली दखनी औरंगाबादी हे या भाषेतील मोठे नाव आहे.

























































