ठसा – डॉ. गोपाळराव पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

लातूर जिह्यात अनेक मातब्बर लोक झाले, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ स्वतःचेच नाही तर गावाचे, जिह्याचे, राज्याचे नाव लौकिकास पात्र केले. असेच एक नाव म्हणजे डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील. ज्यांना वैद्यकीय, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांतील ‘देवमाणूस’ असे म्हटले जात होते. त्यांचे नुकतेच निधन झाले.

डॉ. गोपाळराव पाटील यांचा जन्म धाराशिव जिह्यातील कवठा, ता.उमरगा या छोट्या गावात हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. एम.बी.बी.एस.(डी.सी.एच.) ही पदवी घेऊन त्यांनी बालरोगतज्ञ म्हणून नावलौकिक मिळविला. प्रचंड वाचन, आयुष्यभर शिकण्याची आवड, कठोर परिश्रम करण्याची सवय हे त्यांचे विशेष गुण होते. केवळ मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. कुर्नूल, हैदराबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातील व्याख्याता म्हणूनही डॉ.गोपाळराव पाटील यांनी उत्कृष्ट काम केले. 1961 ते 1965 या काळात कुरुंदवाड, जि. कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी केलेली सेवा एवढी वैशिष्ट्यपूर्ण होती की, कुरुंदवाड नगरपालिकेने एका भव्य सार्वजनिक कार्यक्रमात ‘मानपत्र’ देऊन त्यांची प्रशंसा केली होती. त्यानंतर त्यांनी 1965 मध्ये लातूर येथे बालरोगतज्ञ म्हणून स्वतःचा खासगी दवाखाना सुरू केला आणि त्यांच्या तीन डॉक्टर मित्रांसोबत 12 वर्षे मुरुड (जि. लातूर) येथील रुग्णांना मोफत समाजसेवा दिली. आणि सर्वसामान्य लोकांनी त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून गौरवले. डॉ.गोपाळराव पाटील यांनी इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनची एक शाखा स्थापन केली आणि तिचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. अनेक अखिल भारतीय परिषदांना हजेरी लावली. 1998 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वार्षिक परिषदेत त्यांना ‘सर्वोत्कृष्ट डॉक्टर संसदीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे ते संस्थापक आणि नंतरचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात राजर्षी शाहू कॉलेजला 2003 मध्ये NAAC द्वारे मान्यता मिळाली आहे. या कॉलेजला ‘अ’ श्रेणी मिळाली आहे.

डॉ.गोपाळराव पाटील लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या जिल्हा 323 डीचे माजी जिल्हा गव्हर्नर होते, ते मेल्विन जोन्स फेलो होते. त्यांना आंतरराष्ट्रीय अध्यक्षांकडून दोन प्रशंसा व प्रशस्तीपत्रक, पदके प्रदान करण्यात आली होती. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या प्रकल्प अध्यक्ष आणि अनुदान प्रशासक म्हणून मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब उदगीरने (जि. लातूर) डॉ. लखोटिया आणि त्यांच्या टीमच्या मदतीने ‘लायन्स उदयगिरी रुग्णालय’ स्थापन केले आहे. या रुग्णालयाने 8 ते 9 वर्षांत 80हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे, आणि जगभरात लायन्सने सुरू केलेल्या 450 रुग्णालयांमध्ये एक आदर्श निर्माण करून समाजात आणि लायनिस्टिक जगात एक अद्वितीय स्थान मिळवले आहे. डॉ. गोपाळराव पाटील हे 1994 ते 2000 या काळात राज्यसभा खासदार होते. त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या संसदीय समित्यांचे आणि पेटंट, कापूस, वॅगन इत्यादी राज्यसभेच्या विशेष समित्यांचे सदस्य म्हणून काम केले होते. डॉ.गोपाळराव पाटील यांना ‘माहितीची डिक्शनरी’ म्हटले जायचे. वेगवेगळ्या विषयांवर त्यांना असलेली माहिती सर्वांना अचंबित करत असे. अगदी चित्रपटसृष्टीतील बारकावे असोत की अणू, परमाणू, हायड्रोजन अशा वैज्ञानिक किंवा धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील माहिती असो, त्यांच्याकडे सविस्तर असायची.