
कांजूरच्या डंपिंग ग्राऊंड व त्यातून तयार होणाऱया मिथेन वायूचा त्रास केवळ कांजूरच नव्हे तर लगतच्या विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडच्या रहिवाशांनासुद्धा होत आहे ही चिंतेची बाब असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने आज डंपिंगमुळे होणाऱया प्रदूषणावरून पालिकेला सुनावले. इतकेच नव्हे तर रात्री 1 ते पहाटे 6 दरम्यान होणाऱया मिथेन वायूचे उत्सर्जन व प्रदूषण रोखण्यासाठी सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठाने पालिकेला दिले.
कांजूर मार्ग डंपिंग ग्राउंड प्रकरणी दयानंद स्टॅलीन यांच्या वनशक्ती संस्थेने तसेच विक्रोळी कन्नमवार नगर येथील रहिवाशांनी अॅड. अभिजित राणे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या डंपिंगमुळे दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत असून यावर प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी सोसायटीसाठी वकील श्रीराम कुलकर्णी आणि अॅड. अभिजीत राणे तसेच वनशक्तीसाठी अॅड. जमान अली यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, या प्रदूषणाचा परिणाम केवळ 15 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कन्नमवार नगर परिसरावरच नाही, तर विक्रोळी, मुलुंड आणि भांडुप येथील रहिवाशांवरसुद्धा होत आहे. त्यावर न्यायालयाने चिंता व्यक्त करत सांगितले की, मोठय़ा लोकसंख्येवर परिणाम करणाऱया या प्रदूषणाकडे अजिबात दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्यावर पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
पालिकेचे मुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अविनाश काटे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केले की, मिथेन उत्सर्जनाची दखल घेण्यात आली असून ही बाब संबंधित क्षेत्रातील तज्ञांना कळवण्यात आली आहे. त्यांनी त्याच अहवालाचा अभ्यास करण्यासाठी आणि तातडीच्या उपाययोजनांचा विचार करण्यासाठी दोन आठवडय़ांचा वेळही मागितला. या युक्तिवादानंतर खंडपीठाने सुनावणी 7 मेपर्यंत तहकूब केली.
मिथेन उत्सर्जनाची तपासणी
न्यायालयाला कळवण्यात आले की, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूटचे (व्हीजेटीआय) प्रशांत भावे, नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटचे (निरी) गणेश काळे आणि आयआयटी-मुंबईचे अनुराग गर्ग यांच्यासह इतर तज्ञ, मिथेन उत्सर्जनाशी संबंधित तपासणी करतील व त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करतील.
वायू उत्सर्जनचा माहिती फलक
न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी इतर विविध वायूंच्या उत्सर्जनाबद्दलही चिंता व्यक्त केली. पर्यावरणाच्या हितासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी उत्सर्जित होणाऱ्या विविध वायूंची पातळी दर्शवणारा प्रदूषण पातळीचा फलक संबंधित ठिकाणी लावण्यात यावा, असे आदेश हायकोर्टाने पालिकेला दिले. संबंधित माहितीदर्शक फलक तज्ञांकडून तयार करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) सल्ल्याने एका महिन्याच्या आत लावण्यात यावा, असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले.


























































