
>> सचिन सावरीकर
भारताने 2011 ते 2025 दरम्यान अंदाजे 12 हजार 670 टन सोन्याची आयात केलेली. या आयातीचा एपूण खर्च साधारणतः 609 अब्ज डॉलर होता. 4 एप्रिल 2026 रोजी प्रति औंस 4,677 डॉलर्सच्या बाजारभावानुसार, भारतातील या आयात सोन्याचे मूल्य आता अंदाजे 1.905 ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर इतके झालेले आहे. 1.9 ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर्सचा हा आकडा केवळ 2011 पासून आयात केलेल्या सोन्याचा आहे. पिढ्यान्पिढ्या घराघरांत साठवलेला सोन्याचा साठा त्याहूनही मोठा आहे आणि तो या आकेडवारीत समाविष्ट करण्यात आलेला नाही.
आर्थिक धोरणांची आखणी करणाऱ्या भारतीय धुरिणांनी सोन्याकडे पिढ्यान्पिढ्या नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे. सोन्याची आयात भारतीयांची दशकानुदशकांची सवय राहिल्याने ती देशासाठी कायमस्वरूपी आर्थिक समस्या बनली आहे, असाच त्यांचा दृष्टिकोन राहिलेला आहे. धोरणकर्त्यांच्या मते सोने आयात म्हणजे परकीय चलनाचा ऱहास आणि ती बचतीची अतिशय कालबाह्य अशी सवय होय, पण त्यांची ही धारणा चुकीची ठरली आहे. भारतीयांची जी सवय त्यांना एक ओझे किंवा देशाच्या डोक्यावरील आर्थिक दायित्व वाटत होते, तीच सवय प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या इतिहासात घरगुती पातळीवर संपत्ती निर्मितीची मोठी कृती ठरली आहे.
भारताने 2011 ते 2025 दरम्यान अंदाजे 12 हजार 670 टन सोन्याची आयात केलेली. या आयातीचा एकूण खर्च साधारणतः 609 अब्ज डॉलर होता. 4 एप्रिल 2026 रोजी प्रति औंस 4,677 डॉलर्सच्या बाजारभावानुसार, भारतातील या आयात सोन्याचे मूल्य आता अंदाजे 1.905 ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर इतके झालेले आहे. यातील केवळ 1.3 ट्रिलियन डॉलर इतकी दरवाढ ही भारताच्या एकूण परकीय चलन साठय़ापेक्षाही अधिक आहे. या काळात अन्य कोणत्याही वित्तीय मालमत्तेने, सरकारी योजनेने अथवा वित्तीय योजनेने भारतीय कुटुंबांसाठी इतक्या विशाल प्रमाणात संपत्तीची निर्मिती केलेली नाही.
लक्ष वेधणारी आकडेवारी
सोन्यामुळे झालेल्या या संपत्ती निर्मितीचे अवाढव्य प्रमाण लक्षात येते. 2015 मध्ये 35 अब्ज डॉलर्स खर्चून आयात केलेल्या सोन्याचे मूल्य आज 157 अब्ज डॉलर झाले आहे. मूल्यात तब्बल 350 टक्के वाढ झाली आहे. 2018 मध्ये 32 अब्ज डॉलर्स खर्चून खरेदी केलेल्या सोन्याचे मूल्य आता चौपट होऊन ते 142 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. अगदी 2020 मधील कोरोना महामारीच्या वर्षात भारताने तब्बल 22 अब्ज डॉलर्स खर्चून 430 टन सोने आयात केले होते. याच सोन्याचे मूल्य आजच्या दरानुसार 65 अब्ज डॉलर्स झाले आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्य आजच्या घडीला किमान दुप्पट झालेले नाही, असे 2011 ते 2025 दरम्यानचे एकही वर्ष सापडणार नाही. दरवर्षी सोन्याचे मूल्य वाढतच गेलेले आहे.
अनेक दशकांपासून अर्थतज्ञांनी ‘बॅलन्स ऑफ पेमेंट्स’ या चौकटीच्या पातळीवर आयात सोन्याच्या प्रत्येक टनाकडे देशावरचे आर्थिक ओझे या दृष्टिकोनातूनच पाहिले. सोन्याची मागणी रोखण्यासाठी सरकारने आयात शुल्कात वाढ केली. तसेच 2013 च्या 80ः20 सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासुद्धा लागू केल्या, पण यापैकी एकही उपाययोजना प्रभावी ठरू शकलेली नाही. भारतीय कुटुंबे सोने खरेदीचा केवळ भावनिक निर्णय घेत नव्हते; तर तो एक तर्पसंगत आर्थिक निर्णय होता. आता ही ‘कालबाह्य’ सवय प्रत्यक्षात त्यांच्यासाठी एक प्रगल्भ आर्थिक संरक्षणरूपी कवच ठरले आहे.
1.9 ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर्सचा हा आकडा केवळ 2011 पासून आयात केलेल्या सोन्याचा आहे. पिढ्यान्पिढ्या घराघरांत साठवलेला सोन्याचा साठा त्याहूनही मोठा आहे आणि तो या आकेडवारीत समाविष्ट करण्यात आलेला नाही. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अंदाजानुसार भारतीय कुटुंबांकडे 25,000 ते 34,600 टन सोन्याचा साठा आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचे मूल्य 3.8 ट्रिलियन ते 5.2 ट्रिलियन डॉलर्सदरम्यान आहे. हे मूल्य ढोबळमानाने भारताच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच जीडीपीच्या बरोबरीचे आहे.
सोने हे ‘मृत भांडवल’ (डेड कॅपिटल) नाही. सोने हे लाखो लोकांसाठी, विशेषतः ग्रामीण भारतीयांसाठी आर्थिक सुरक्षेचा पाया आहे. सोने हा धातू एकाच वेळी तारण, वारसा आणि आपत्कालीन राखीव साठा अशी तिहेरी भूमिका पार पाडतो. ज्या समुदायांना याची सर्वात जास्त गरज भासते, त्यांच्यासाठी बँकेतील कोणतीही ठेव योजना अद्यापही सोन्यासारख्या या बहुआयामी कार्यांची जागा घेऊ शकलेली नाही.
2025 मध्ये सोन्याने धुवांधार कामगिरी केली. या वर्षात सोने दराने 53 वेळा उच्चांकी पातळी गाठली आणि अमेरिकी डॉलरच्या आधारावर 67 टक्के इतका घसघशीत वार्षिक परतावाही दिला. रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा देशांतर्गत परतावा थेट 73 टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे सोने ही इतर सर्व मालमत्ता प्रकारांना मोठय़ा फरकाने मागे टाकत सर्वोत्पृष्ट कामगिरी करणारी आर्थिक मालमत्ता ठरली आहे.
2026 मध्ये सोन्याचे दर स्थिरावताना दिसत आहेत. एकाच वर्षात दराने 53 वेळा उच्चांकी पातळी गाठल्यानंतर 4,677 अमेरिकी डॉलर्सच्या आसपास दर रेंगाळलेले दिसत आहेत, परंतु दर रेंगाळण्याची ही प्रक्रिया म्हणजे दर पुन्हा खाली येणे नसून बाजार या नवीन दरांशी जुळवून घेताना दिसत आहे. जानेवारीत सोन्याला 5,594 डॉलर्सपर्यंत नेणारे मूलभूत घटक अजूनही सक्रिय आहेत आणि हे घटक म्हणजे वाढत चाललेली वित्तीय तूट, मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सुरू असलेली खरेदी आणि दबावात असलेला वास्तविक परतावा हे आहेत. ऐतिहासिकदृष्टय़ा अवलोकन केल्यास मोठ्या तेजीच्या वर्षानंतर अशा प्रकारे दराचे स्थिरीकरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक फायदेशीर प्रवेश बिंदू ठरले आहेत. सध्याची परिस्थितीही त्याला अपवाद नाही.
गिफ्ट सिटीच्या माध्यमातून नवनवीन संधींचे दालन
अगदी अलीकडच्या काळापर्यंत भारतीय गुंतवणूकदारांकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत आणि परकीय चलनात व्यवहार करणाऱ्या माध्यमाच्या आधारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा कोणताही व्यावहारिक मार्ग उपलब्ध नव्हता. आता आयएफएससीएने (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण) केलेल्या नियमांमधील बदलांमुळे अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि निवासी भारतीयांसाठी ‘गिफ्ट सिटी’मध्ये व्यावसायिकरीत्या व्यवस्थापित केले जाणारे आणि प्रत्यक्ष सोन्याचा आधार असलेल्या गोल्ड फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग खुले झाले आहेत.
गिफ्ट सिटीमधील गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणूकदारांना लाभ मिळवून देऊ शकतात आणि त्याच वेळी सोन्याच्या प्रत्यक्ष आयातीचा देशावरील दबावसुद्धा कमी करू शकतात. सोन्याबद्दल भारतीयांना असलेल्या खास आकर्षणाचा अतिशय चपखल वापर करून स्थानिक मागणी नियमित आणि कायदेशीर प्रणालीकडे वळवता येईल. या सुविधेमुळे सोन्याचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होईल. सोने ही नेहमीच भारतीयांच्या मालकीची सर्वाधिक मोठी आणि व्यापक स्वरूपातील मालमत्ता राहिलेली आहे. ही मालमत्ता सर्वाधिक परतावा देणाऱ्या मालमत्तांपैकी एक आहे हेदेखील सध्याच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. आपल्या पूर्वजांकडून पिढ्यान्पिढ्या मिळालेला हा वारसा सध्याच्या परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे चुकीचे आहे, असे म्हणणाऱ्या टीकाकारांच्या आर्थिक सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने अधिक विश्वासार्ह ठरला आहे.





























































