पालिका म्हणते… काँक्रीटीकरणामुळे खड्डे घटले, कोट्य वधीचा खर्च वाचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिमेंट-काँक्रीटीकरण धोरणामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डय़ांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे खड्डे आणि रस्ते दुरुस्तीवर होणारा खर्चदेखील कमी झाला आहे. 2023 मध्ये खड्डे बुजवण्यासाठी 203 कोटींचा खर्च केला होता, तर 2026 मध्ये 44 कोटींचा खर्च करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

मुंबईत 2050 किमीचे रस्ते असून त्यापैकी 1,224 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील 700 कि.मी. पैकी 525 रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तर 179 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सर्व रस्ते सिमेंट-काँक्रीट करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. रस्ते सिमेंट-काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या टप्पा 1 अंतर्गत सुमारे 256.36 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. निर्धारित उद्दिष्टापैकी 83.25 टक्के कामांची पूर्तता झाली आहे. तर टप्पा-2 अंतर्गत सुमारे 222.79 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उद्दिष्टापैकी 60.29 टक्के कामांची पूर्तता झाली आहे. सर्व रस्ते कामे 31 मेपूर्वी सुरक्षित स्थितीत आणली जातील असे त्या म्हणाल्या.

खड्डेविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी परिमंडळनिहाय कंत्राटदार/एजन्सी नियुक्त करणार.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे भरणे / रस्ते सुधारण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त करणार.

प्रत्येक निवडणूक प्रभागासाठी दुय्यम अभियंता आणि रस्ते अभियंता यांची पावसाळी कर्तव्यासाठी नियुक्ती.

रस्त्यांवरील खड्डे तसेच दुरुस्तीच्या तक्रारीसाठी ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे अॅप विकसित केले आहे.