
वसई दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलीचा मृतदेह चिंचोटीजवळील खदाणीच्या पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खदाणीत बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव रुकसान खान असे असून ती आशानगर बापाणे भागात राहात होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुकसान आपल्या मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती सापडली नाही. चिंचोटीजवळील खदाणीच्या पाण्यात तिचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. स्थानिकांनी याची माहिती तातडीने नायगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.




























































