पालघर जिल्ह्यातील साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात, नववी, दहावीचे वर्ग बंद होणार; सरकारच्या कृपेने शिक्षणाच्या आयचा घो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात राज्य सरकार करीत आहे. मात्र पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या ६८ शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून नववी, दहावीचे वर्ग बंद होणार असून तब्बल साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. त्यापैकी २ हजार १४१ विद्यार्थी एकट्या तलासरी तालुक्यातील असून सरकारच्या कृपेने पालघरमध्ये शिक्षणाच्या आयचा घोळ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यात ५७ माध्यमिक शाळा आहेत. खासगी शाळांची फी परवडत नसल्याने आदिवासीबहुल वाड्या-वस्त्यांतील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. नववी व दहावीच्या वर्गांमध्ये ६ हजार ५०० विद्यार्थी असून त्यांना कंत्राटी तत्त्वावर ६८ शिक्षक शिकवतात. या शिक्षकांना सेस फंडातून जिल्हा परिषदेमार्फत दरमहा आठ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. मात्र यापुढे सेस फंडातून पगार देणे शक्य नसल्याचे कारण देत शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

“सरकार एका बाजूने सक्तीचे शिक्षण करते, तर दुसऱ्या बाजूने नववी, दहावीचे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. आम्ही आपल्या मुलांचे प्रवेश कुठे करायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.” – संजय बोबा, (पालक)

“माझी मुलगी नववीच्या वर्गात आहे. दुसऱ्या शाळेत नववीला प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मुलींना शाळा शिकवायचे कुठे? सरकारने हा प्रश्न तत्काळ सोडवावा.” – कैलास मळवकर, (पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष)

आंदोलनाचा इशारा
शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय हा अन्यायकारक असून त्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. शिक्षण विभागाने आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देण्यात आला आहे.