
भाजपकडून पश्चिम बंगालच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच आज खळबळजनक घटना घडली. बंगाल भाजपचे प्रमुख नेते व मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे खासगी सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात रथ यांचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम मतदारसंघात ही घटना घडली. चंद्रनाथ रथ हे कारने चालले होते. हल्ल्याच्या आधी बराच वेळ त्यांचा पाठलाग करण्यात आला. रथ यांच्या गाडीचा वेग कमी झाल्याची संधी साधून त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळय़ा झाडण्यात आल्या. जखमी रथ यांना रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.


























































