
>> दिलीप ठाकूर
आज चित्रपट निर्मितीत दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची जी लक्षवेधक अशी घोडदौड सुरू आहे, त्याची बीजे रोवलेल्या आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांत आर. बी. चौधरी यांचे नाव आवर्जून घेतले जाई. 1988 साली त्यांनी ‘आधी पायम’ या मल्याळम भाषेतील चित्रपटाची निर्मिती करत या क्षेत्रात पाऊल टाकले आणि मग त्यांनी एक प्रकारचा चित्रपट निर्मितीचा धडाकाच लावला. तेलुगू आणि तामीळ चित्रपटांची सातत्याने निर्मिती हे त्यांचे ठळक वैशिष्टय़. त्यासह त्यांनी कन्नड, मल्याळम आणि अगदी हिंदी भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपट निर्मितीची संख्या अलीकडेच शंभरीपार गेली होती आणि चित्रपट निर्मितीच्या आगामी योजना ते आखत असतानाच त्यांचे 5 मे रोजी राजस्थानातील उदयपूर येथे अपघातांत दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या दुर्दैवी निधनावर कमल हासन, रजनीकांत, चिरंजीव, व्यंकटेश, खुशबू सुंदर अशा दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियात एक्सवर श्रद्धांजली अर्पण केली.
आर. बी. चौधरी यांची दोन मुले जिवा आणि जितेन हे तेलगू तामीळ चित्रपटांत नायकाची भूमिका साकारत आहेत. आर. बी. चौधरी यांच्या निधनानंतर त्यांनी आपला मुलगा जिवा याची भूमिका असलेल्या ‘थलेवर थम्बी थलपेयी’ या तामीळ चित्रपटाच्या यशाच्या सोहळ्यात आपल्या मुलाचे चुंबन घेतले त्या क्षणाचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला. 30 एप्रिल रोजी हा सोहळा रंगला. तो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा असा चित्रपटविषयक सोहळा ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते.
आर. बी. चौधरी यांचे पूर्ण नाव रतनलाल भगतराम चौधरी. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील. त्यांनी सुपर गुड फिल्म्स या बॅनरखाली चित्रपट निर्मिती केली. दक्षिण भारतातील ही एक अग्रगण्य चित्रपट निर्मिती संस्था म्हणून ओळखली जाते. त्यांनी अनेक नवीन दिग्दर्शकांना आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेत पहिली संधी दिली. त्यांनी निर्माण केलेल्या ते ‘नट्टमै’, ‘आनंदम’, ‘राजा’, ‘चेरन पंडियन’, ‘जिला’, ‘गॉडफादर’ अशा अनेक चित्रपटांनी खणखणीत ज्युबिली यश प्राप्त केले. त्यांनी निर्माण केलेल्या ‘नाटय़मयी’ या तेलुगू भाषेतील चित्रपटाच्या यशाने आर. सार्थकुमार आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला.
आर. बी. चौधरी यांनी तामीळ भाषेत निर्माण केलेल्या ‘सूर्यवमसम’ या लोकप्रिय चित्रपटाची ‘सूर्यवंशम’ (1999) या नावाने हिंदी भाषेत रिमेक केली. या चित्रपटातील अमिताभ बच्चननी साकारलेल्या भानुप्रताप सिंग या व्यक्तिरेखेची भरपूर चर्चा झाली. याच भानुप्रताप सिंगच्या हिरा या मुलाच्या भूमिकेतही अमिताभ बच्चनच! मुंबईत हा चित्रपट लिबर्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण हा चित्रपट रसिकांना आवडला नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांनी केले आहे. या चित्रपटात दक्षिणेकडील सौंदर्या, जयासुधा या आघाडीच्या अभिनेत्रींबरोबरच अनुपम खेर, बिंदू, मुकेश रिशी, बिंदू इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्माते आर. बी. चौधरी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत भरपूर पैसा खर्च केला. आपल्या चित्रपटात अमिताभ बच्चन भूमिका साकारत आहे याचा त्यांना विशेष आनंद झाला होता. अतिशय दिलदार आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले चित्रपट निर्माते म्हणून आर. बी. चौधरी ओळखले जात.


























































