
शिक्षण अर्धवट सोडून 44 वर्षे हातात एके-47 घेऊन दहशत माजवणाऱ्या तेलंगणातील नक्षलवादी कमांडरने वयाच्या 62 व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली आहे. थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. देवजी याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. मात्र फेब्रुवारीमध्ये तो पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत समाजाच्या मुख्य प्रवाहात परतला. यानंतर देवजी याने पुन्हा एकदा शिक्षणाचा मार्ग स्वीकारत 62 व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, देवजी याने बुधवारी जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला शहरातील मेस्ट्रो ज्युनियर कॉलेजमध्ये इंटरमिजिएट पब्लिक अॅडव्हान्स्ड सप्लिमेंटरी परीक्षा दिली. ही परीक्षा तेलंगणा माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (टीबीई) राज्यभरात 12 ते 20 मे दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या इंटरमिजिएट पुरवणी परीक्षांचा एक भाग आहे.
देवजी एक वरिष्ठ माओवादी कमांडर म्हणून 80च्या दशकापासून सक्रिय होता. कोरुतला येथील आंबेडकर नगरचे रहिवासी असलेले देवजी, इंटरमिजिएट (एमपीसी) पदवीचे शिक्षण घेत असतानाच 1983 मध्ये नक्षलवादी चळवळीत सामील झाले.

























































