
>> वर्णिका काकडे
देहवाली बोली ही प्रामख्याने भिल्ल समाजात बोलली जाते. महाराष्ट्रातील धुळे,नंदुरबार या भागात आदिवासी भिल्ल लोक मोठय़ा प्रमाणावर आहेत त्या भागात देहवाली बोली बोलली जाते. प्रदेशाप्रमाणे या भूभागाच्या उत्तर व पश्चिमेला गुजरातचे गुजराती भाषेचे लोक बडोदा, सुरत हे जिल्हे तसेच नर्मदा पलीकडचा मध्य प्रदेशाचा हिंदी भाषेत झाबुवा जिल्हा तसेच पूर्वेला महाराष्ट्राचे मराठी व अहिराणी भाषेचे धुळे आणि जळगाव जिल्हे असून देहवाली बोलीचा या भागात प्रभाव दिसून येतो.
या बोलीवर गुजराती आणि हिंदी भाषेचा या बोलीवर मोठा प्रभाव आढळतो. देहवाली बोलीचे गुजराती भाषेची वाक्यरचना ही मिळतीजुळती आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवाली बोली ही अनुनासिक भाषा आहे. तिच्या मूळ स्वरात ‘ळ’,’क्ष’,’ज्ञ’ ही व्यंजने नाहीत तर ‘छ’,’श’,’ष’ ऐवजी ‘स’ एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेत काही वेळा वाक्यरचना हिंदी सारखी केली जाते तर तुलनेने मराठीचा प्रभाव नगण्य वाटतो.मराठीमध्ये देहवाली बोलीत फारसा ताळमेळ नसल्याने नंदुरबार, धुळे जिह्यातील देहवाली बोली बोलणाऱ्यांना मराठी भाषा बोलणे व समजणे कठीण जाते.
गुजरातीतील ‘उंडो’ हा शब्द देहवालीत त्याच अर्थाने व उच्चाराने बोलला जातो. मराठीमध्ये मात्र त्यासाठी ‘खोल’ हा शब्द वापरला जातो. भिल्ल जमातीचे होळी गीत,भक्तीगीत, रोडाली गीत यांचा खूप मोठा खजिना देहवालीत उपलब्ध आहे. असच खांबूल्या देवाचं एक गीत…
पागे पोडीने आर टाका रे आर टाका
खांबूल्या देवूले आर टाका रे आर टाका
अर्थ – पाया पडूनी माळा अर्पावी हो माळा अर्पावी, खांब देवाला माळा अर्पावी हो माळा अर्पावी
त्याचप्रमाणे या बोलीभाषेत पशु,पक्षी, प्राणी त्यांची काही नावे मराठी सारखी तर काही मराठी पेक्षा वेगळी जसे वडदा – वड, वाग – वाघ, कोलो- कोल्हा असे आहेत. देहवाली बोलीतील होळी गीते खूप प्रसिद्ध आहेत जसे की –
सागर भरला माहू फुलला, हिरवा चढाव चढे गरैया हिरवा चढाव चढे
या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमी द्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
भिल्ल समाजाच्या जिह्यांमध्ये वळवी, वसावे, पाडवी, नाईक, गावित अशा आडनावांचा एक मोठा समाज समूह वास्तव्य करतो.































































