मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले; नागरिकांमध्ये नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-goa-highway-work-delayed-public-outrage-over-pending-construction

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ३१ मे २०२६ पर्यंतची मुदत दिली असली, तरी प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः कळंबस्ते बौद्धवाडी रेल्वे क्रॉसिंग परिसरात महामार्गावरील पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इतर बहुतांश ठिकाणी चार पदरी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असताना या ठिकाणी एकेरी मार्गावर वाहतूक सुरू असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच अनेक ठिकाणी महामार्गाचा रस्ता खालच्या पातळीवर असून गटारे उंच झाल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत आहे. यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. चिपळूण येथील डॉ. आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंतच्या बहुचर्चित पुलाचे काम देखील पूर्ण होण्यास पुढील वर्ष उजाडणार आहे. या पुलादरम्यान दोन्ही बाजूने सुरू असणाऱ्या एकेरी वाहतुकीत अनेकदा अडथळे निर्माण होऊन वारंवार अपघात देखील घडत आहेत. या पुलाच्या उर्वरित कामाची गती वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.