IPL 2026 – ऋषभ पंत लखनौच्या कर्णधारपदावरून पायउतार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करण्यात ऋषभ पंत हा सपशेल अपयशी ठरला होता. पंतच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर राहिला आहे, त्यामुळे पंतची कर्णधारपदावरून उचलबांगडी होणार असे सर्वांनाच वाटत होते, पण फ्रँचायझीने कर्णधारपदावरून काढून टाकण्यापूर्वीच पंतने पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे मालक संजीव गोएंका यांनी तब्बल 27 कोटी रुपये खर्च करत पंतला आपल्या संघात स्थान दिले होते, पण आता त्याचे हे 27 कोटी पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.

लखनौच्या संघाचा उतरता आलेख…

लखनौने यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले, पण त्यानंतर संघाला संघर्ष करावा लागला. त्यांनी पुढील 11 सामन्यांपैकी फक्त दोनच जिंकले. 8 गुणांसह लखनौचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. लखनौने 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या दोन हंगामात संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. तेव्हा केएल राहुल कर्णधार होता. 2024 मध्ये फ्रँचायझीने राहुलला संघातून मुक्त केले आणि पंतला संघात स्थान देत कर्णधारपदाची धुरा सोपवली, पण पंत आपली भूमिका निभावण्यात सपशेल अपयशी ठरला.

राजीनाम्याची घोषणा

लखनौ सुपर जायंट्सने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, पंतने स्वतः कर्णधारपदावरून पायउतार होण्याची विनंती केली होती. फ्रँचायझीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, ‘ऋषभ पंतने फ्रँचायझीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची विनंती आम्हाला केली होती, जी मागणी आम्ही तत्काळ मान्य केली आहे.’

पंतने राजीनामा का दिला?

ऋषभला गेल्या हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावात लखनौने 27 कोटी रुपयांना संघात घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पंतने कर्णधारपदही स्वीकारले, पण त्यानंतर दोन्ही हंगामात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्याने 2025 मध्ये 13 डावांत 269 धावा केल्या. त्यानंतर 2026 मध्ये 13 डावांत 312 धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश होता. त्यामुळे फलंदाजी आणि नेतृत्वात अपयशी ठरल्यामुळे अखेर त्याने हा नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हार्दिकबरोबर अजिंक्यचीही पडू शकते विकेट…

आयपीएल अजून संपलीही नाही, पण तरीही कर्णधारांच्या विकेट्स पडायला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जात आहे. ऋषभ पंतने लखनौच्या संघाचे कर्णधारपद सोडले असून पहिली विकेट पडली आहे. त्यानंतर हार्दिक पंडय़ा आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची बिकट अवस्था पाहायला मिळाली. त्यानंतर हार्दिक मुंबईचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजिंक्यने आपल्यापरीने केकेआरचे नेतृत्व केले खरे, पण संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. केकेआरने भवितव्याचा विचार केला तर त्यामध्ये अजिंक्य फिट बसत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पंतनंतर हार्दिक आणि अजिंक्य यांचीही कर्णधारपदं जाणार का हे पाहावे लागेल.