
मुंबई महापालिकेत महापौर बसवल्यानंतर भाजप-शिंदे गटाने 100 दिवसांचा ‘मुंबई विकासा’चा रोडमॅप तयार करीत मुंबईकरांना सेवा-सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सोयी-सुविधा दूरच सत्ताधाऱ्यांनी केवळ 100 दिवसांत 100 टेंडरची दरवाढ करून टेंडर काढल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला.
मुंबईच्या विकासाची अपेक्षा अर्थसंकल्पात सफशेल फोल ठरल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी केला. मुंबईकरांचे एक हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप महायुतीने केला आहे. मात्र 100 टेंडरमध्ये केवळ दरवाढ केली आहे, गेल्या चार वर्षांतील टेंडर रिओपन करा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. या वेळी माजी नगरसेविका शीतल म्हात्रे उपस्थित होत्या. अर्थसंकल्पातून मिळालेल्या 800 कोटींमधून विरोधकांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. त्यामुळे भाजपने आता आपले ब्रीदवाक्य, ‘स्वतः प्रथम, पक्ष नंतर आणि मुंबईकर शेवटी’ असे केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘जेम’ पोर्टलवर खरेदीच्या नावे घपला
शैक्षणिक वस्तूंची खरेदी ‘जेम’ पोर्टलवरून करण्याचा अट्टाहास सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. मात्र प्रत्यक्षात ‘जेम’ पोर्टलवर स्पर्धा होऊ नये आणि मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्याची व्यवस्था सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोपही आझमी यांनी केला. ‘जेम’ पोर्टल म्हणजे दलालांसाठी नवा मार्ग असल्याचेही ते म्हणाले.


























































