
चौक-कर्जत मार्गावर रविवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. बोलेनो आणि ब्रिझा या दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील चौक-कर्जत मार्गावरील भिलवले गावाच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील चारचाकी वाहनाला कारने धडक दिल्याने हा अपघात झाला असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात प्रकाश सोनावळे (४९), पत्नी पल्लवी सोनावळे (४३), मुले प्रिशेष सोनावळे (२२) आणि वेदांत सोनावळे (१५) हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




























































