
एक हजार 400 कोटी रुपयांच्या ‘एस कुमर्स नेशनवाइड लिमिटेड’ (एसकेएनएल) बँक घोटाळा प्रकरणी ईडीने रायगडमध्ये मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार एसकेएनएलचे माजी अध्यक्ष नितीन कासलीवाल यांनी मुरूडच्या समुद्र किनाऱयात 60 कोटी रुपयांची मालकत्ता खरेदी केली होती. ही आलिशान मालमत्ता ईडीच्या इंदूर उप-क्षेत्रीय कार्यालयाने जप्त केली आहे.
एस कुमर्स नेशनवाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नितीन कासलीवाल यांनी या घोटाळ्यातील पैसा पांढरा करण्यासाठी एक मोठे जाळे तयार केले होते. कासलीवाल यांनी विविध बँकांच्या समूहाकडून तब्बल एक हजार 400 कोटी रुपयांचे कर्ज आणि इतर पतसुविधा घेतली होती. नंतर या कर्जाची परतफेड न करता बँकांची फसवणूक केली. बँकांकडून घेतलेला हा निधी ज्या कारणासाठी घेतला होता, तिथे न वापरता नितीन कासलीवाल यांनी स्वतŠच्या आणि कुटुंबाच्या नियंत्रणाखालील स्थापन केलेल्या अनेक बनावट पंपन्यांमध्ये परस्पर वळता केला होता. बँकांकडून लाटलेल्या या पैशांचा वापर करूनच मुरुड येथे ही आलिशान जागा खरेदी करण्यात आली होती. त्यामुळेच ही मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लंडनमध्येही झाली होती कारवाई
या घोटाळ्याप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी 23 डिसेंबर 2025 रोजी मोठय़ा प्रमाणावर छापे टाकले होते. त्यावेळी कासलीवाल यांच्या परदेशातील ट्रस्ट आणि ऑफशोअर कंपन्यांच्या गुप्त जाळ्याचा पर्दाफाश झाला होता. त्या तपासाच्या आधारे ईडीने यापूर्वी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसजवळ असलेली 119.55 कोटी रुपयांची हाय–व्हॅल्यू मालमत्ता देखील जप्त केली आहे.





























































