
गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने मालाड येथे कारवाई करून कोडेन फॉस्फेट सिरपची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली. अटक केलेल्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. अर्सलान खान, विश्वकर्मा माली, मोहम्मद सोहेल खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. शनिवारी दुपारी युनिट 11 चे पथक मालाड परिसरात गस्त करत असताना त्यांना या चौघांकडून ड्रगमिश्रित कोडेन फॉस्फेट सिरप सापडले. त्यांची चौकशी केली असतना हे सिरप नवी मुंबई येथील एका गोदामात ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्त शिक्षिकेची केली फसवणूक
पेन्शनसह विम्याची रक्कम वाढवून देतो असे सांगून ठगाने वृद्ध शिक्षिकेच्या बँक खात्यावर डल्ला मारला. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या निवृत्त शिक्षिका आहेत. गेल्या आठवडय़ात त्या घरी होत्या तेव्हा त्यांना एका नंबरवरून फोन आला. त्याने तो बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याने पेन्शनसह विम्याची रक्कम वाढवून देण्यासाठी योजना असल्याचे सांगितले. त्या योजनेचा फायदा होणार असल्याच्या थापा मारल्या. ठगाने तिला एक एपीके फाईल पाठवली. त्यावर विश्वास ठेवून तिने ती लिंक उघडली असतना तिच्या बँक खात्यातून पाच लाख रुपये चोरी झाले.
गुंतवणुकीच्या नावाखाली केली फसवणूक
व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला कुरार पोलिसांनी अटक केली. पिंटू शहा असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार तरुणीची काही महिन्यांपूर्वी पिंटू शहाशी लग्न जुळवणाऱया संकेतस्थळावरून ओळख झाली. ओळखीनंतर ते चांगले मित्र झाले. त्या दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. पिंटू याने त्याचा स्वतःचा व्यवसाय असल्याचे सांगितले. व्यावसायासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे असून त्याने मदत करण्याची विनंती केली. तीन टक्के व्याजदराने मूळ रक्कम परत करू असे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून तिने त्याला दोन टप्प्यांत अकरा लाख रुपये दिले होते. मात्र तिने पैशाची मागणी केली असता भामटय़ाने वेगवेगळी कारणे देत तिची फसवणूक केली.

























































