
चंद्रपूर काँग्रेसमधील सत्तासंघर्षाचा वाद विकोपाला गेला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार समर्थक चंद्रपूर महापालिकेतील गटनेता राजेश अडूर यांना बदलण्यात यावे अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांनी घेतली आहे. राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्यात यावी अशी मागणी धानोरकर गटाकडून विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
चंद्रपूर पालिकेत काँग्रेसचे 27 नगरसेवक असून त्यापैकी 16 खासदार धानोरकर यांच्यासोबत आहेत, तर 11 विजय वडेट्टीवार यांच्यासोबत आहेत. महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना दोन्ही गटातील वाद चांगलाच तापला होता. सत्तासंघर्षाचा हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र आता पुन्हा एकदा पालिकेतील गटनेते पदावरून चंद्रपूर काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे.
नगरसेवकांच्या संख्याबळाच्या जोरावर धानोरकर गटाने गटनेतेपदावर दावा केला आहे. आता विभागीय आयुक्त आणि पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हा नगरसेवकांचा निर्णय – प्रतिभा धानोरकर
धानोरकर यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना हा संघर्ष वैयक्तिक नसल्याचे स्पष्ट केले. हा वाद माझा किंवा विजय वडेट्टीवार यांचा नाही. काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजकीय भूमिकेनुसार निर्णय घेतला आहे, असे त्या म्हणाल्या.
व्हिप झुगारणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करणार – राजेश अडूर
आम्ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहोत, त्यामुळे पक्षाची शिस्त पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. सोशल मीडियावर पत्रकबाजी करून गटनेता बदलण्याची भाषा करणाऱ्यांना हा अधिकार कोणी दिला? व्हिप झुगारून बैठकीला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी आम्ही कायदेशीर पावले उचलत आहोत, असे चंद्रपूर पालिका काँग्रेस गटनेते राजेश अडूर म्हणाले.

























































