दीड लाखाचं कुरासाव वादळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
austria-beats-jordan-3-1-fifa-world-cup-historic-return-after-28-years (1)

>> मंगेश वरवडेकर

जगाच्या नकाशावर बोट फिरवत कुरासाव शोधायला निघालात तर अनेकांना दोन-तीनदा चष्मा पुसावा लागेल. काहींना तर दुर्बीणच लागेल. पॅरेबियन समुद्रातलं ते छोटंसं बेट. लोकसंख्या अवघी दीड लाख. म्हणजे मुंबईच्या दादर, परळ, लालबाग परिसरात जितकी माणसं राहतात त्यापेक्षाही कमी. पण या बेटाने जे केलं, ते 147 कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानला अजून जमलेलं नाही.

कुरासावने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये प्रवेश करून फुटबॉल विश्वाला अक्षरशः हादरा दिला. लोकसंख्येच्या दृष्टीने वर्ल्ड कपमध्ये पोहोचणारा सर्वांत छोटय़ा देशांपैकी एक म्हणून त्यांनी इतिहास लिहिला.

कुरासावची राजधानी विलेमस्टॅड. बंदरावर उभ्या असलेल्या रंगीबेरंगी डच शैलीतील इमारती पाहिल्या की वाटतं एखाद्या चित्रकाराने समुद्राच्या निळ्या पॅनव्हासवर रंगांची उधळण केली आहे. पूर्वी नेदरलॅण्ड्स अँटिलीजचा भाग असलेला हा देश 2010 पासून नेदरलॅण्ड्स साम्राज्यातील स्वायत्त राष्ट्र बनला. डच शिस्त, आफ्रिकन मुळे, पॅरेबियन बेफिकिरी आणि लॅटिन अमेरिकन जिद्द यांचं विलक्षण कॉकटेल म्हणजे कुरासाव. पण या देशाकडे ना अब्जावधींच्या लीग, ना हजारो कोटींचे प्रायोजक, ना लाखो चाहत्यांनी भरलेली स्टेडियम्स.

…मग हा संघ वर्ल्ड कपपर्यंत पोहोचलाच कसा?

याचं उत्तर त्यांच्या रक्तात आहे. कुरासावचा फुटबॉल इतिहासही फार जुना नाही. फिफाच्या मोठय़ा नकाशावर हा देश कालपरवाच दिसू लागला. 2011 मध्ये स्वतंत्रपणे फिफा सदस्यत्व मिळाल्यानंतर त्यांनी प्रवास सुरू केला. सुरुवातीला त्यांना कोणी फारसं गांभीर्याने घेत नव्हतं. पॅरेबियनमध्ये जमैका, हैती, त्रिनिदाद-टोबॅगो, कोस्टारिका, पनामा अशा संघांच्या सावलीत कुरासाव हरवून जात होता, पण लहान देशांचं एक वैशिष्टय़ असतं. त्यांना कोणी घाबरत नाही आणि त्यामुळेच ते निर्भय होतात. कुरासावनेही तेच केलं. युवक विकासावर भर दिला. डच फुटबॉलचा वारसा स्वीकारला. तांत्रिक कौशल्य वाढवलं. आणि मग हळूहळू पॅरेबियन फुटबॉलमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. 2017 मध्ये त्यांनी पॅरेबियन कप जिंकला. 2019 च्या गोल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आणि मग सुरू झाली वर्ल्ड कपची मोहीम. पात्रता फेरीत त्यांनी एकही सामना गमावला नाही.

जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगोसारख्या बलाढय़ संघांना मागे टाकत त्यांनी गटात अव्वल स्थान मिळवलं. दहा सामन्यांत अपराजित राहणं हा योगायोग नसतो. तो नशिबाचा लॉटरी तिकीट नसतो. ती असते नियोजनाची कमाई. ती असते घामाची व्याजासकट परतफेड. ती असते एका देशाच्या सामूहिक हट्टाची कहाणी. या कहाणीतील दुसरा नायक म्हणजे प्रशिक्षक डीक अॅडवोपॅट. या 78 वर्षांच्या डोकेबाजाला विसरून चालणार नाही. वर्ल्ड कपमधील सर्वांत वयोवृद्ध प्रशिक्षक म्हणून त्यांनी विक्रम केला.

वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात समोर होता चार वेळचा विजेता जर्मनीसामना संपला. स्कोअरबोर्डवर 7-1. कागदावर हा पराभव होता. पण इतिहासाच्या वहीत? तो विजय होता. कारण त्या एका गोलने कुरासावने वर्ल्ड कपमध्ये आपलं नाव कोरलं. लाखभर लोकांच्या देशाने जगातील सर्वांत मोठय़ा फुटबॉल स्टेजवर पहिल्यांदा गोल केला. त्या क्षणी स्कोअरबोर्डवर एक आकडा वाढला नव्हता. एका देशाचा आत्मविश्वास वाढला होता. पण कुरासावची खरी ताकद स्टेडियममध्ये नाही. ती विमानतळांवर आहे. ती नेदरलॅण्ड्सच्या रस्त्यांवर आहे. ती जगभर पसरलेल्या त्यांच्या संततीत आहे. कुरासावचा वर्ल्ड कपचा फॉर्म्युला एका शब्दात सांगायचा तर तो आहे. डायस्पोरा पॉवर म्हणजे परदेशात स्थायिक झालेले आपल्याच देशाचे नागरिक.

नेदरलॅण्ड्समध्ये जन्मलेले, आयॅक्स, फेयेनूर्ड, पीएसव्हीसारख्या अकादमींमध्ये घडलेले खेळाडू आपल्या मूळ बेटासाठी खेळायला आले. ताहित चॉंग, लिआँड्रो बाकुना, जुनिन्हो बाकुना. अशा अनेक खेळाडूंनी कुरासावला युरोपियन दर्जाचं कौशल्य दिलं. त्यांचं शरीर डच मैदानांवर घडलं. पण हृदय कुरासावसाठी धडधडलं आणि इथेच 147 कोटींच्या हिंदुस्थानसमोर एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिला आणि पुढे राहणारही. आपण अजून कुठे आहोत?

जर दीड लाख लोकांचं बेट जगभर विखुरलेल्या आपल्या मुलांना एकत्र करून वर्ल्ड कप गाठू शकत असेल, तर हिंदुस्थाननेही हा विचार करायला हवा. फुटबॉलच्या बाबतीत आपली सर्वात मोठी ताकद कदाचित मुंबई, कोल्हापूर गोवा, कोलकाता किंवा केरळमध्ये नसून लंडन, टोरांटो, मेलबर्न आणि न्यूयॉर्कमध्येही दडलेली असू शकते. लाख लोकांचं बेट जगभर विखुरलेल्या आपल्या मुलांना एकत्र करून वर्ल्ड कप गाठू शकत असेल, तर हिंदुस्थाननेही हा विचार करायला हवा.

कुरासावने आपल्याला एक धडा शिकवलाच आहे. मोठं होण्यासाठी मोठा भूभाग लागत नाही. मोठी लोकसंख्या लागत नाही. मोठा इतिहासही लागत नाही. लागतो तो मोठा विश्वास. तो विश्वास आता हिंदुस्थानींना मिळवायचाय, मग फिफा वर्ल्ड कप फार दूर नसेल.