
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ (NEET) परीक्षा आणि त्याभोवती निर्माण झालेला वाद विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून गेल्या काही दिवसांत तीन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येऊन आपले जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आज 21 जून रोजी फेरपरीक्षेच्या घेण्यात येत आहे. यापूर्वीच अशा घटना घडल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंडिया टु़डेने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबाद, गाझियाबाद आणि लखनऊमध्ये एकूण 3 विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. हैदराबाद येथे एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने फेरपरीक्षेच्या आदल्या दिवशीच तरुणीचा टोकाचा निर्णय घेतला. शेख सना असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती मियापूर भागात आपल्या बहिणींसोबत राहून ‘नीट’ची तयारी करत होती. तिचे वडील कुवेतमध्ये कार्यरत आहेत, तर आई 10 दिवसांपूर्वी प्रोद्दातूर येथे गेली होती.
रविवारी होणाऱ्या फेरपरीक्षेचा दबाव, कुटुंबाच्या अपेक्षा आणि मागील अपयशाची भीती यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात “माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही,” असे म्हटले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
वारंवार अपयश आल्याने विद्यार्थ्याचे पाऊल, व्हिडिओ केला रेकॉर्ड
दुसरे प्रकरण हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील आहे. येथील विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून जीवन यात्रा संपवली. अनेक प्रयत्न करूनही ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याने तो नैराश्यात होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असे सांगत, परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. गुरुवारी रात्री अभ्यासाच्या खोलीत गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृत अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून व्हिडिओ जप्त केला आहे.
तिसरी घटना ही लखनऊच्या बाजार खाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे राहणाऱ्या 17 वर्षीय सुहानी यादव या विद्यार्थिनीने मंगळवारी राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले. पोलिसांनी तपास केला असता घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. सुहानीचे कुटुंब मूळचे पाटणा येथील असून तिचे वडील रेल्वेमध्ये तिकीट परीक्षक (TTE) म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी झालेल्या ‘NEET’ परीक्षेत सुहानीने उत्तम कामगिरी केली होती आणि ती उत्तीर्ण होईल अशी खात्री होती. मात्र, पेपर फुटीमुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) ही परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द झाल्यामुळे सुहानी प्रचंड नैराश्यात गेली होती आणि 21जूनच्या फेरपरीक्षेच्या तयारीच्या मानसिक दबावाखाली होती. यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
























































