गँग ऑफ गद्दार… पळपुटे सहा खासदार शिंदे गटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप आणि मिंधे गटाकडून देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेने दिल्लीतील संसदीय कार्यालयात बोलावलेल्या बैठकीला दांडी मारणारे पळकुटे सहा खासदार आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या ‘गँग ऑफ गद्दार’मध्ये सामील झाले.

‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडण्याचा उद्योग महाराष्ट्रात करण्यात आला. शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लोकसभेला निवडून आलेल्या संजय जाधव, नागेश पाटील-आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दिना पाटील, ओम निंबाळकर या सहा खासदारांनी मिंध्यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसैनिकांच्या भीतीने हे 6 खासदार दिल्ली, जयपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. या सहा खासदारांनी गद्दारांचे सरदार असणारे शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ‘गँग ऑफ गद्दार’मध्ये प्रवेश केला.

  • संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील-आष्टीकर हे चार खासदार आज दुपारी दीड वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर पोहोचले. पोलिसांच्या गराड्यात, वाय प्लस सुरक्षेत चौघेही भेदरलेल्या अवस्थेतच गाडीपर्यंत पोहोचले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा ताफा शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याकडे रवाना झाला.
  • बंडखोर खासदार ओम निंबाळकर धाराशीवमधून मुंबईत आले तर मुंबईतच लपून बसलेले संजय दिना पाटील पोलिसांच्या गराडय़ात शिंदेंच्या बंगल्यावर दाखल झाले.

महायुतीत धारावी आणि ईशान्य मुंबईत पेच

या 6 खासदारांपैकी काही खासदार हे 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव करून संसदेत पोहोचले आहेत. धाराशीवमध्ये ओम निंबाळकर यांनी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. तर ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. हे दोन खासदार शिंदे गटात सामील झाल्याने आगामी निवडणुकीत महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

गद्दारांचे चेहरे पडलेले, भेदरलेले

सहाही खासदारांचे चेहरे पडलेले दिसत होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना बेधडक, मनाचे राजे, ओपनिंग बॅट्समन अशा वेगवेगळ्या उपाध्या देऊन हसवण्याचा प्रयत्न केला. परंतु केवळ हात जोडण्याइतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. सर्वांचे चेहरे रडवेले दिसत होते. नव्या घरात प्रवेशाच्या आनंदापेक्षा राजकीय अंत्ययात्रेची चाहूल त्यांच्या चेहऱयावर उमटली होती. शिंदे यांनी फोटो काढण्यासाठी गद्दार खासदारांचे हात धरून उंचावले तेव्हासुध्दा त्यांच्या चेहऱयावर हसू उमटल्याचे दिसले नाही.