
कारचा अपघात झाल्यानंतर त्वरित एअरबॅग उघडून प्रवाशांचा जीव वाचतो. पण भाईंदरमध्ये आज झालेल्या एका कार अपघातातात एअरबॅगने चालकाचाच बळी घेतल्याची घटना घडली आहे. एअरबॅग उघडून त्याचा फटका या चालकाच्या गळ्याला बसला आणि त्याचा मृत्यू झाला. मोहित सोनी (25) असे या दुर्दैवी कारचालकाचे नाव आहे.
मोहित सोनी हा काशिमीरा परिसरातील टिआरा हिल्स या इमारतीत राहात होता. बुधवारी दुपारच्या सुमारास काशिमीरा परिसरातील प्लेझंट पार्क येथे त्याची कार दुभाजकाला धडकली. या किरकोळ अपघातानंतर कारची एअरबॅग अचानक बाहेर आली. ही एअरबॅग मोहितच्या गळ्याला जोरात लागली. गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याला तात्काळ भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.



























































