कर्करोगाशी झुंज, तरीही हिमालय सर! 69 वर्षीय नफिसा अलींचा 11 हजार फूटांचा ट्रेक पूर्ण; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेत्री, माजी मिस इंडिया नफिसा अली यांनी पुन्हा एकदा आपल्या जिद्दीची ताकद दाखवून दिली आहे. चौथ्या टप्प्यातील कर्करोगावर उपचार सुरू असतानाही 69 वर्षीय नफिसा अली यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग परिसरात तब्बल 11 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग पूर्ण करून अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. या ट्रेकदरम्यानचे व्हिडिओ आणि छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली असून, त्यांच्या धैर्याचे आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.

 

ट्रेकचा व्हिडिओ शेअर करताना नफिसा यांनी सांगितले की, मित्र आणि कुटुंबीयांसोबत 11 हजार फूट उंचीवर केलेल्या या ट्रेकमुळे त्यांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना झाली. त्यांनी लिहिले की, शस्त्रक्रिया आणि अनेक केमोथेरपी सत्रांनंतर हा अनुभव त्यांच्यासाठी आयुष्याला नवी ऊर्जा देणारा ठरला.

 

नफिसा यांनी आणखी एका पोस्टमध्ये सांगितले की, हा ट्रेक करणे सोपे नव्हते. मात्र त्यांचे जावई आदिल आणि नातू अमेर यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांना आधार दिला. त्यांच्या मदतीमुळे त्या सुरक्षितपणे खडकाळ मार्ग पार करून पुन्हा गाडीपर्यंत पोहोचू शकल्या. हा अनुभव अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

या सहलीदरम्यान नफिसा अली आपल्या कुटुंबासोबत अटल बोगदा पार करून सिसू येथे पोहोचल्या. हिमालयाच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये 11 हजार फूट उंचीवर त्यांनी कुटुंबासह पिकनिकचा आनंद घेतला. हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले. 2018 मध्ये नफिसा अली यांना तिसऱ्या टप्प्यातील पेरिटोनियल आणि ओव्हेरियन कर्करोगाचे निदान झाले होते. उपचारानंतर 2019 मध्ये त्यांनी स्वतःला कर्करोगमुक्त घोषित केले. मात्र, गेल्या वर्षी त्यांनी कर्करोग पुन्हा झाल्याची आणि तो चौथ्या टप्प्यावर पोहोचल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा केमोथेरपी सुरू असूनही त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

 

नफिसा अली या केवळ यशस्वी अभिनेत्रीच नाहीत, तर माजी मिस इंडिया आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूदेखील आहेत. त्यांनी जुनून, मेजर साब, लाइफ इन अ… मेट्रो, बेवफा आणि यमला पगला दिवाना यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि धर्मेंद्र यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम केले आहे.