नशेबाजांसाठी आणलेला 95 लाखांचा ‘हायड्रो गांजा’ जप्त, गुन्हे शाखेची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसामुळे वातावरण थंड झाल्याने मस्त दम मारून झिंगण्यासाठी नशेबाजांची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालक व मालकाला गुन्हे शाखेने दणका दिला. पाऊस पडत असल्याची संधी साधत गुपचूप नशेबाजांना हायड्रो गांजा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना युनिट-9 ने पकडले. त्यांच्याकडून तब्बल 974 ग्रॅम वजनाचा व 94 लाख 70 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

अंधेरी पश्चिमेकडील जे. पी. मार्गावर असलेल्या कामधेनु स्टोअरजवळ एक जण हायड्रो गांजा विकण्यासाठी येणार असल्याची खबर युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार सह आयुक्त अनिल कुंभारे, अपर आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उपायुक्त नवनाथ ढवळे, एसीपी विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक व पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. गुरुवारी संध्याकाळी सुरेंद्र यादव हा तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पाच ग्रॅम हायड्रो गांजा सापडला. चालकाचे काम करतो व गाडी मालकाच्या सांगण्यावरून हा गांजा इथे आणल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पथकाने सुरेंद्र याचा मालक आदित्य सिंग याला ताब्यात घेतले आणि घराची झडती घेतले असता त्याने घराच्या मागील बाजूस इमारतीच्या डक्टच्या खाली 942 ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा पावसात भिजल्याने तो सुकत ठेवलेला मिळून आला. अशा प्रकारचे युनिट-9 ने चालक व मालकाला पकडून 94 लाख 70 हजार किमतीचा हायड्रो गांजा धूर निघण्याआधीच पकडला. या गुह्याचा पुढील तपास वर्सोवा पोलीस करत आहेत.