म्हाडाच्या मालकीचा मोक्याचा भूखंड महाटेनिस फाऊंडेशनच्या घशात घातला, संजय पोतनीस यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी येथील मोक्याच्या जागेवरील म्हाडाच्या मालकीचा तब्बल आठ हजार चौरस मीटरचा भूखंड कोणत्याही निविदा न मागवत महाराष्ट्र टेनिस फाऊंडेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या म्हाडाच्या या भूखंडावरील महाटेनिस सोबतच्या विकास योजनेचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.

अंधेरी येथील कोले कल्याण म्हाडाच्या मालकीचा भूखंड करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित आहेत. पण म्हाडाने या भूखंडावर म्हाडाने महाराष्ट्र टेनिस फाऊंडेशनसोबत संयुक्त विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मालकीची सुमारे 8 हजार चौरस मीटर जमीन महाटेनिस फाऊंडेशनला 30 वर्षांसाठी दिला आहे. म्हाडाच्या धोरणांनुसार हा भूखंड निविदा काढून वितरित करणे आवश्यक होते. पण तरीही निविदा न काढता महाराष्ट्र टेनिस फाऊंडेशनला संस्थेची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी म्हाडामार्फत 10 कोटी रुपयांचे भाग भांडवलही दिले आहे. हा भूखंड म्हाडाच्या मालकीचा असूनही म्हाडाने गुंतवणूक केली असून केवळ 60 टक्के भागीदारी केली आहे. हा निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय थेट घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून म्हाडाकडे याबाबतचा खुलासा मागवला. पण अद्याप उत्तर दिले नाही याकडे संजय पोतनीस यांनी लक्ष वेधले.