
देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) वापराला प्रोत्साहन दिले जात असताना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) च्या एका अहवालात E10 सुसंगत वाहनांमध्ये E20 इंधन वापरल्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसला तरी केंद्र सरकार आणि वाहन उत्पादकांसाठी तो महत्त्वाचा संदर्भ मानला जातो. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
अहवालानुसार, E10 फ्रेंडली वाहनांमध्ये E20 इंधन वापरल्यास इंधन प्रणालीतील रबरचे होज, गॅस्केट, सील आणि ओ-रिंग यांसारख्या भागांमध्ये झीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे भाग बदलण्याची आवश्यकता भासू शकते, अशी शिफारस करण्यात आली आहे.
चारचाकी वाहनांच्या इंजिन चाचण्यांमध्येही काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. एका BS-IV इंजिनची कामगिरी E20 इंधनावर समाधानकारक आढळली. मात्र, BS-VI टर्बोचार्ज्ड इंजिनमध्ये 265 तासांच्या टिकाऊपणा चाचणीनंतर तांत्रिक बिघाड आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इंजिन टिकाऊपणाच्या चाचण्यांमध्ये दोन वाहन उत्पादकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एका कंपनीच्या इंजिनमध्ये 400 तासांच्या चाचणीनंतर कोणतीही समस्या आढळली नाही आणि E20 इंधनासह इंजिनची कामगिरी समाधानकारक होती. मात्र, दुसऱ्या कंपनीच्या इंजिनमध्ये एकूण 809 तासांच्या चाचणीनंतर एक्झॉस्ट व्हॉल्व्हमध्ये थर्मोमेकॅनिकल बिघाड आढळला.
थर्मोमेकॅनिकल बिघाड म्हणजे अतिउष्णता आणि सततच्या यांत्रिक हालचालींमुळे इंजिनमधील एक्झॉस्ट व्हॉल्व्ह वाकणे, तडे जाणे किंवा तुटणे. मात्र, या बिघाडामागे इतरही कारणे असू शकतात, असे या चाचणीची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले आहे. तसेच वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, इंजिनची टिकाऊपणा चाचणी साधारणपणे 2,000 तासांपर्यंत केली जाते.
दुसरीकडे, तीन दुचाकी उत्पादकांच्या इंजिन चाचण्यांमध्ये कोणतीही अडचण आढळली नाही आणि E20 इंधनावर त्यांची कामगिरी समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, E20 इंधनामुळे वाहनातील धातूचे भाग किंवा वाहनाच्या संरचनेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. तसेच E20 वापरल्यानंतर वाहनांमधून होणारे टेलपाईप उत्सर्जन कायदेशीर मर्यादेतच राहते.
मात्र, E20 इंधनामुळे इंधनाचा वापर (फ्युएल कन्झम्प्शन) E10 च्या तुलनेत 2 ते 6 टक्क्यांनी वाढतो, म्हणजेच वाहनाचे मायलेज कमी होऊ शकते. ही वाढ प्रत्येक वाहनानुसार वेगवेगळी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, बाष्पीभवनामुळे होणारे उत्सर्जन (Evaporative Emissions) देखील निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. तसेच वाहन सुरू होणे (Startability) आणि चालवण्याची क्षमता (Drivability) या दोन्ही बाबतीत E20 इंधनाची कामगिरी समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.




























































