
क्रिकेटमध्ये ‘ऑफ स्टंप’ उडतो. पण फुटबॉलमध्ये शनिवारी स्विस ऑफ’ झाला. अर्जेटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडचा ३-१ असा फडशा पाडत उपांत्य फेरीचे दार लाथेने उघडले. आता समोर उपांत्य फेरीत जगज्जेत्यांसमोर इंग्लंडचे जबर आव्हान असेल. म्हणजे फुटबॉलच्या इतिहासात पुन्हा एकदा पेटणार आहे सर्वात जुनं सर्वात तापलेलं आणि सर्वात भावनिक युद्ध. येत्या १६ जुलैला हे युद्ध रंगेल.
सुरुवातीला वाटलं अर्जेंटिना आरामात उपांत्य फेरीत जाणार मेस्सीने उजव्या विगेवरून असा रेशमी क्रॉस टाकला की, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरने तो थेट स्विस जाळ्यात खुपसला, पण स्विस म्हणजे आल्प्स पर्वत सहज ढासळत नाहीत. हॅन एनडोयेने बरोबरीचा गोल करत अर्जेंटिनाला घाम फोडला. त्यानंतर स्विस बचावाने असा किल्ला बांधला की, मेस्सीपासून अल्वारेझपर्यंत प्रत्येक जण त्यावर डोके आपटत होता.
मग आला सामन्याचा स्फोटक क्षण. व्हीएआरने ब्रिल एम्बोलोला लाल कार्ड दाखवायला पंचांना भाग पाडले आणि स्वित्झर्लंड दहा खेळाडूंवर आला. तरीही किल्ला पडत नव्हता पण सिंह शिकार करताना संयम सोडत नाही. ११२ व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने २५ यार्डवरून अशी क्षेपणास्वासारखी किक मारली की, चेंडू जाळ्याच्या कोपऱ्यात घुसला आणि ‘अजेंटिनाकडून स्विस ऑफ’ हे चार शब्द संपूर्ण स्टेडियममध्ये घुमले. स्विसांनी अखेरचा जुगार खेळला.
सामन्यात बरोबरीसाठी सर्वस्व पणाला लावत त्यांनी आपले सर्व खेळाडू पुढे आणले. पण त्याचाच फायदा घेत लॉटारो मार्टिनाने प्रतिआक्रमणातून तिसरा गोल ठोकला आणि अर्जेटिनाने निजपावर शिक्कामोर्तब केले.
आता रंगणार आहे विश्वचषकातील खरी ब्लॉकबस्टर लढत. एका बाजूला मेस्सीचे सलग दुसरे जगज्जेतेपद पटकावण्याचे स्वप्न. दुसऱ्या बाजूला बेलिंगहॅम आणि हॅरी केनचा इंग्लिश ताफा १९८६ चा हिशेब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार. आता गुरुवारी चेंडू फक्त फिरणार नाही तर इतिहास पुन्हा एकदा धगधगणार आहे.





























































