
पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाप्रकरणी शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून याला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. वांगचुक यांच्या या सरकारविरोधातील बेमुदत उपोषणाला आता कलाकारही सहभागी झाले आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून आज गुरूवारी ते एक दिवसीय उपोषण करणार आहेत.
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत अतुल कुलकर्णी यांनी घरूनच एक दिवस उपोषण करणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, या उपोषणाची दोन कारणे आहेत. पहिलं म्हणजे, मला सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेदनांची जाणीव करून घ्यायची आहे. दुसरं कारण म्हणजे, सरकारला मी विनंती करू इच्छितो की त्यांनी या मुद्द्याबाबत संवेदनशीलता दाखवावी, असे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केले.
View this post on Instagram
अतुल कुलकर्णी पुढे म्हणाले की, सोनमजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, त्यांच्या मागण्यांमागे गंभीर आणि चिंताजनक कारणे आहेत. मात्र दुसरीकडे, सरकारला मात्र असं वाटतंय की त्यांचे युक्तिवाद आणि मागण्या योग्य नाहीत. पण म्हणून सरकार असंवेदनशील आहे, असं मला वाटत नाही. अनेक प्रसंगी सरकारने लोकांच्या भावना आणि अडचणी समजून घेतल्या आहेत. मात्र, यावेळी या प्रकरणात काही गैरसमज असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंमधील संवादात अडथळा येतोय.
माझी सरकारला हीच विनंती आहे की, सरकारने यामध्ये लक्ष घालावे आणि संवाद साधावा. जर तुम्हालाही माझे म्हणणे पटत असेल किंवा सोनमजी आणि त्यांचे सहकारी ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्यामागच्या भावना समजत असतील तर ही रील नक्की शेअर करा. तसेच तुम्ही सुद्धा एक दिवसाचे उपोषण करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला केले आहे.




























































