एसआयआरमध्ये अनेक त्रुटी आणि विसंगती, राष्ट्रवादीची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआरचे (मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम) काम सुरू असले तरी अॅपवरील मतदार यादीत अनेक त्रुटी आणि विसंगती आढळून येत आहेत. या प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे गुरुवारी करण्यात आली.

एसआयआरमधील अडचणींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व पक्षाच्या ‘एलजीबीटीक्यू’ सेलच्या प्रमुख प्रिया पाटील यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

मतदारांच्या अडचणी तातडीने दूर करून यादीतील चुका दुरुस्त कराव्यात, प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या भेटीनंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एसआयआरचे काम सुरू असले तरी अॅपवरील मतदार यादीत अनेक त्रुटी आणि विसंगती आढळून येत आहेत. ‘बीएलओ’ गोंधळलेल्या परिस्थितीत असतात. बऱ्याच ठिकाणी ते मतदारापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. असे अनेक प्रश्न आहेत ते आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. या प्रक्रियेत मुदतवाढ मिळावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. तरीही मतदारांनी आवर्जून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी सामान्य मतदारांना केले आहे. याशिवाय राज्यभरातील ‘एलजीबीटीक्यू’ समूहातील लोकांचे अनेक प्रश्न आहेत. याबाबत निवडणूक आयोगालाही माहिती दिली आहे. त्या संदर्भात कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन चोक्कलिंगम यांनी आम्हाला दिले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.