गुन्हे वृत्त- आठ लाखांच्या चोरी प्रकरणी नोकराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ लाख रुपयांचा ऐवज चोरी करणाऱ्या नोकराला अंबोली पोलिसांनी अटक केली. राहुलकुमार शफी असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे राहुलकुमार हा घरगडी म्हणून काम करत होता. दोन दिवसांपूर्वी तक्रारदार हे त्यांच्या पत्नीसोबत कामावर निघून गेले होते. – तेव्हा त्यांची आई घरी होती. किचनमध्ये काम करताना राहुलच्या खिश्यातून एक सोन्याची बांगडी पडली. त्या बागडीबाबत – विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर राहुल हा अचानक न सांगता निघून गेला. हा प्रकार तक्रारदार यांना संशयास्पद वाटला. त्यांनी कपाटातील सर्व दागिन्यांची पाहणी केली. तेव्हा कपाटातून दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घडल्या प्रकरणी तक्रारदार यांनी अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. – पोलिसांनी राहुलकुमार विरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी काही तासांतच राहुलकुमारला ताब्यात घेऊन अटक केली.

घातक शस्त्र तस्करीप्रकरणी गुन्हा नोंद
मुंबई : विनापरवाना घातक शस्त्र बाळगणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी दणका दिला. पोलिसांनी कारवाई करून एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली. घडल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अनुपम यादव विरोधात गुन्हे वृत्त गुन्हा नोंद केला.

तक्रारदार हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते गस्त करत होते. तेव्हा महाकाली गुंफा येथे एक जण अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांचे पथक वेरावली जलाशय परिसरात गेले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेण्यात आली. पोलिसांनी अनुपमकडून देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली. अनुपमकडे शस्त्राबाबत कोणताही परवाना नव्हता. हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनुपमविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्याने ते अग्निशस्त्र कुठून आणले होते, त्याचा तो कशा प्रकारे वापर करणार होता याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.