
<< वर्णिका काकडे
एकाच झाडावर तब्बल 22 प्रकारच्या आंब्यांचे उत्पादन घेण्याची आश्चर्यकारक कामगिरी महाराष्ट्रातील सांगली जिह्यातील जत तालुक्यातील अंतराळ गावचे शेतकरी काकासाहेब सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी एकाच आंब्याच्या झाडावर देश-विदेशातील आंब्याच्या तब्बल 44 वाणांचे कलम केले होते. यापैकी 22 वाणांचे आंबे यंदाच्या हंगामात चाखण्यास मिळाले. यामध्ये केशर, हापुस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी अशा देशी आणि काही विदेशी आंब्याच्या जाती समाविष्ट आहेत.
एकाच झाडाला सावंत यांनी वेगवेगळ्या जातीची 44 कलम केली. यातील 22 जातीचे कलम लागू झाले आणि यंदा या एकाच झाडांच्या आंब्याला 22 प्रकारचे आंबे लगडले. 22 जातीच्या मिळून जवळपास 700 आंबे लागले होते.
मूळचा नर्सरीचा व्यवसाय असणारे काकासाहेब सावंत पुण्यात नोकरी करीत होते. शेतीच्या प्रेमापोटी पुण्यातील नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जत हा तसा बारमाही दुष्काळी भाग. परंतु तरीही शेतीत नवनवीन प्रयोग करत काकासाहेब यांनी आपली शेतीतील आवड वेगळ्या दिशेला नेली. काकासाहेब यांचा रोपवाटिकेचा व्यवसाय आहे. नर्सरीच्या या व्यवसायात असंख्य प्रकारची रोपे त्यांच्याकडे आहेत. शेतीतील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कौशल्य या गुणांच्या बळावर काकासाहेब शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत असतात. वेगवेगळ्या जातीची, संकरित अशी झाडांची, फुलझाडांची रोपे त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत. आंब्याच्या प्रत्येक जातीची रोपे त्यांच्याकडे असल्याने असा प्रयोग करावा असे त्यांच्या मनात आले. ही रोपे विकताना ग्राहक या जातीचे फळ कसे आहे हे विचारत असे. या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे तर प्रत्येक झाड स्वतंत्र लावणे अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी जागेची उपलब्धता व गुंतवणूक करणेही त्यांना शक्य नव्हते. यावर उपाय म्हणून व जागृत झालेले कुतूहल शमविण्याच्या प्रयत्नांतून वेगळाच प्रयोग त्यांनी साकारला. एकाच झाडावर या विविध जातीच्या रोपांची कलमे करण्यात आली आणि त्यातूनच 22 प्रकारचे देश-विदेशी आंबे चाखण्यास मिळाले असे काकासाहेब सांगतात.


























































