जीटीबी नगर स्टेशनचा कायापालट होणार; एमआरव्हीसीकडून वेगाने काम सुरू, आठ महिन्यांत मल्टी-लेव्हल हब तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर (जीटीबी) नगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमार्फत (एमआरव्हीसी) ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3’ अंतर्गत स्थानकाच्या अद्ययावतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यानुसार आठ महिन्यांत मार्च 2027पर्यंत रेल्वे स्थानकाचे आधुनिक आणि हायटेक मल्टी-लेव्हल हबमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने ठेवले आहे.

प्रवाशांची मागणी लक्षात घेत एमआरव्हीसीने एमयूटीपी-3 प्रकल्पा अंतर्गत जीटीबी नगर स्थानकाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलण्याचे पाऊल टाकले आहे. या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनची लांबी 330 मीटरपर्यंत वाढवली जात आहे, जेणेकरून भविष्यात येथे 15 डब्यांची लोकल चालवता येईल. तसेच स्थानकाच्या पश्चिम बाजूला 330 मीटर लांबीचा होम प्लॅटफॉर्म-1ए तयार केला जात आहे आणि या नव्या प्लॅटफॉर्मच्या पश्चिम बाजूला नवीन स्कायवॉक बांधण्यात येत आहे. हा स्कायवॉक सध्याच्या रोड ओव्हर ब्रिजचा उत्तरेकडील भाग आणि कुर्ला दिशेकडील नवीन पादचारी पुलाला जोडण्यात येईल.  तसेच 6 मीटर रुंदीचे दोन नवीन पादचारी पूल बांधले जात आहेत, अशी माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

जीटीबी नगर रेल्वे स्थानकात सकाळी व सायंकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. एमआरव्हीसीने हाती घेतलेला महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रुंद पादचारी पूल आणि स्कायवॉकमुळे रेल्वे स्थानकातील गर्दी पांगण्यास मदत होईल, असा विश्वास प्रवाशी संघटनांनी व्यक्त केला आहे.