अहिल्यानगरात भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात आज दुपारी भटक्या कुत्र्याने घराबाहेर खेळत असलेल्या एका लहान बालकावर अचानक हल्ला केला. यात बालक जखमी झाले आहे. सातारकर हॉस्पिटलसमोरील बालिकाश्रम रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बालक घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. बालकाच्या आरडाओरडीनंतर शेजारच्या घरातील महिलेने प्रसंगावधान राखत धाव घेत बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. तिच्या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. या घटनेनंतर बागरोजा हडको, गृहशील्प सोसायटी, विद्याविहार सोसायटी, सर्वोदय कॉलनी आणि बालिकाश्रम रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महापालिकेने तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.