
जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळेसमोर मंगळवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी २४ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरभर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयूर मेंदळे (२४) रा. बरवार गल्ली, खडकपुरा, जालना असे मृत युवकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा सुरू करत घटनास्थळ सील केले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरताच मल्टीपर्पस शाळेसमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, शस्त्राचे संभाव्य पुरावे तसेच इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर किती जण होते, त्यांचा मृत युवकाशी पूर्वीचा वाद होता का, अथवा अन्य कोणत्या कारणातून हा खून करण्यात आला, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
या निर्घृण हत्येमुळे जालना शहरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



























































