आरटीई विद्यार्थ्यांकडून फी वसुली; कल्याणच्या शाळेला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार 25 टक्के आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अॅक्टिव्हिटी फीच्या नावाखाली काही शाळा फी आकारत आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने कल्याण पूर्व नांदिवली येथील बी. टी. गायकवाड इंग्लिश स्कूलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका अॅड. कीर्ती ढोणे, विभागप्रमुख शुभम ढोणे आणि शाखाप्रमुख राजेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपये अॅक्टिव्हिटी फी आकारण्यात येत होती. आरटीईच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावयाची पाठ्यपुस्तके, वह्या, वर्कबुक आणि इतर शैक्षणिक साहित्यही देण्यात येत नसल्याची तक्रार पालकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर नगरसेविका अॅड. कीर्ती ढोणे, विभागप्रमुख शुभम ढोणे, शाखाप्रमुख राजेश पाटील यांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने बी. टी. गायकवाड इंग्लिश स्कूलला नोटीस बजावत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा मागविला आहे. केडीएमसीने नोटीसमध्ये शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 तसेच राज्य शासनाच्या संबंधित नियमांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणासह आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे संबंधित शाळेसाठी बंधनकारक असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

२४३ विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने कोणतेही शुल्क आकारण्यात आले असल्यास ते तातडीने संबंधित पालकांना परत करण्याचे निर्देशही केडीएमसीने नोटीसमध्ये दिले आहेत. या कारवाईमुळे शाळेतील आरटीईअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या २४३ विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती शाखाप्रमुख राजेश पाटील यांनी दिली.