वेब न्यूज – लिक्विड ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< स्पायडरमॅन

वाढते प्रदूषण, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि झाडांसाठी कमी पडणारी जागा ही आज मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांनी हवा शुद्ध करण्यासाठी एक वेगळी संकल्पना विकसित केली असून तिचे नाव आहे लिक्विड ट्री. नावात ‘ट्री’ असले तरी हा पारंपरिक वृक्ष नसून सूक्ष्म शैवालांच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी आणि प्राणवायू निर्माण करणारी जैवतांत्रिक प्रणाली आहे. त्यामुळे पर्यावरण क्षेत्रात या तंत्रज्ञानाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. लिक्विड ट्रीमध्ये पाण्याने भरलेल्या पारदर्शक टाकीत सूक्ष्म शैवाल वाढवले जातात. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने हे शैवाल प्रकाश संश्लेषण करतात. या प्रक्रियेत ते वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात.

गर्दीच्या शहरांमध्ये किंवा झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या भागांत अशा यंत्रणेचा उपयोग होऊ शकतो. काही ठिकाणी या प्रणालीला बसण्याची जागा, सौर ऊर्जेवर चालणारी प्रकाश योजना आणि पर्यावरणविषयक माहिती फलकही जोडले जात आहेत. पर्यावरण तज्ञांच्या मते लिक्विड ट्री हा झाडांचा पर्याय नाही. नैसर्गिक वृक्ष जैवविविधतेचे संरक्षण, सावली, तापमान नियंत्रण आणि असंख्य सजीवांना अधिवास देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. मात्र दाट लोकवस्तीच्या भागांत किंवा काँक्रीटच्या जंगलात हवा शुद्ध करण्यासाठी लिक्विड ट्री हा पूरक पर्याय ठरू शकतो. जगातील काही शहरांमध्ये लिक्विड ट्रीच्या प्रायोगिक प्रकल्पांना सुरुवात झाली असून त्यांचे परिणाम अभ्यासले जात आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर झाले तर महत्त्वाची भूमिका असू शकते. भविष्यात हिंदुस्थानातील महानगरांमध्येही अशा प्रणालींचा वापर झाला तर प्रदूषण नियंत्रणाला नवी दिशा मिळू शकते. मात्र त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, विद्यमान झाडांचे संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविणे हीच पर्यावरण संरक्षणाची सर्वात प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राहणार आहे.