आरोग्य – जेवणातील भाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. आशुतोष कुलकर्णी

[email protected]

आयुर्वेदानुसार वनस्पतीचे विविध भाग भाजी म्हणून वापरले जातात आणि प्रत्येक भागाचे औषधी तसेच पौष्टिक महत्त्व वेगवेगळे असते.

वनस्पतीची मुळे म्हणून गाजर, मुळा, बीट आणि रताळे यांचा उपयोग केला जातो. ही मुळे शरीराला पोषण देणारी, बलवर्धक आणि पचनास सहाय्य करणारी मानली जातात.

कंद किंवा भूमिगत खोड या गटात आले, हळद, लसूण आणि कांदा यांचा समावेश होतो. आले हे भूमिगत खोड असून लसूण व कांदा हे कंद आहेत. हे सर्व पदार्थ पचनशक्ती वाढविणारे, कफ-वात कमी करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे मानले जातात.

वनस्पतीच्या देठ किंवा खोडाचा उपयोगही अनेक भाज्यांमध्ये केला जातो. केळीचा गाभा (देठ), कमळाचा देठ आणि अळूचा देठ हे त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. हे पदार्थ तंतुमय असून पचनास मदत करतात आणि मूत्रल गुणधर्म असतात.

पाने म्हणून पालक, मेथी, तांदुळजा, चाकवत आणि शेवग्याची पाने यांचा वापर केला जातो. पालेभाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोहाने समृद्ध असून रक्तवर्धक, पचनास उपयुक्त आणि आरोग्यवर्धक मानल्या जातात.

फुलेदेखील अनेक ठिकाणी भाजी म्हणून वापरली जातात. केळीचे फूल, शेवग्याची फुले, भोपळ्याची फुले आणि अगस्तीची फुले यांचा आहारात समावेश केला जातो. ही फुले कफ-पित्तशामक, पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असतात.

फळे या गटात भेंडी, वांगी, टोमॅटो, दोडका, दुधी भोपळा, कारले, पडवळ आणि तोंडली यांचा समावेश होतो. या फळभाज्या सहज पचणाऱया, विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध आणि दैनंदिन आहारासाठी उपयुक्त आहेत.

वेलींवर येणाऱया फळभाज्या अधिक तंतुमय असल्यामुळे पचन सुधारण्यास आणि पोट साफ होण्याकरिता फायदेशीर ठरतात.

वांगे हे त्रिदोषशामक मानले जाते, परंतु चटकदार करण्यासाठी त्यात तेल, मसाले घालून शिजवल्यामुळे वातपित्त प्रकोपक गुणधर्म वाढतात. म्हणून भरीतसारखे पदार्थ हिरवी मिरची न वापरता केल्यास वांगे गुणकारी ठरते.

मिरची हा एक महत्त्वाचा घटक आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात वापरला जातो.  इंडियन सायन्स नेशनल अकॅडमीच्या संशोधनानुसार मिरची ही भारतातील मूळ वनस्पती नाही. तिचे मूळ मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे आहे. 15 व्या-16 व्या शतकात कोलंबसच्या मोहिमांनंतर पोर्तुगीज व्यापाऱयांनी मिरची युरोपात नेली आणि त्यानंतर ती भारतात आणली. भारतात मिरचीचा प्रवेश साधारण इ.स. 1500-1550 या काळात, विशेषत गोवा आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीमार्गे झाला. काही ऐतिहासिक पुराव्यांनुसार दक्षिण भारतात पोर्तुगीजांमार्फत आणि उत्तर भारतात काही प्रमाणात अरब व्यापाऱयांमार्फत तिचा प्रसार झाला. काही दशकांतच ती संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आणि काळी मिरी व पिंपळी यांची जागा अनेक पदार्थांत तिने घेतली.

मिरची भूक वाढविण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व A आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत, रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. असे असले तरीही मिरचीचे अति सेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात.

आम्लपित्त (Acidity), छातीत जळजळ आणि पोटात आग होऊ शकते. जठरातील अल्सर किंवा गॅस्ट्रायटिस असलेल्या व्यक्तींमध्ये त्रास वाढू शकतो. मूळव्याध (Piles) किंवा गुदद्वाराच्या समस्यांमध्ये जळजळ वाढू शकते. काही लोकांमध्ये अतिसार किंवा पोटदुखी होऊ शकते. अतिप्रमाणात तिखट खाल्ल्यास तोंड, घसा आणि पचनसंस्थेवर तात्पुरता दाह होऊ शकतो.

चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय यांसारख्या प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमध्ये लाल किंवा हिरव्या मिरचीचा उल्लेख नाही. याचे कारण म्हणजे हे ग्रंथ मिरची भारतात येण्याच्या अनेक शतकांपूर्वी लिहिले गेले होते. त्या काळात तिखटपणासाठी काळी मिरी (मरिच), पिंपळी (पिप्पली), सुंठ (सुके आले) आणि मोहरी यांचा वापर केला जात असे. तथापि, मिरची भारतात आल्यानंतर नंतरच्या आयुर्वेदीय निघंटूंमध्ये आणि नंतरच्या आयुर्वेद परंपरेत तिचा स्वीकार झाला.

बिया म्हणून मूग, मटकी, मसूर, हरभरा, वाटाणा, चवळी आणि उडीद यांसारख्या कडधान्यांचा उपयोग भाजी, उसळ किंवा आमटीमध्ये केला जातो. या बिया प्रथिने, तंतू, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत असून शरीराला बळ आणि पोषण देतात.

अंकुर म्हणून मुगाचे, मटकीचे आणि हरभऱयाचे अंकुर तसेच बांबूचे अंकुर खाल्ले जातात. अंकुरित धान्यांमध्ये जीवनसत्त्वे, एन्झाइम्स आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते, त्यामुळे ते अधिक पौष्टिक, सहज पचणारे आणि आरोग्यवर्धक मानले जातात.

अशा प्रकारे आयुर्वेदानुसार वनस्पतीचे मूळ, कंद, देठ, पाने, फुले, फळे, बिया आणि अंकुर हे सर्व भाग त्यांच्या गुणधर्मांनुसार आहारात वापरले जातात. योग्य ऋतू, प्रकृती आणि पचनशक्ती लक्षात घेऊन या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण, दोषांचे संतुलन आणि एकूण आरोग्य राखण्यास मदत होते.