नैराश्याला कंटाळून मानसोपचारतज्ज्ञानेच उचलले टोकाचे पाऊल, घटस्फोटामुळे झाला होता मानसिक आघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे 40 वर्षीय महिला मानसोपचारतज्ज्ञाने निवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवले आहे. डॉ. हिमिका अग्रवाल असे मृत महिलेचे नाव असून त्या गेल्या दीड वर्षांपासून घटस्फोटानंतर नैराश्य आणि मानसिक तणावाचा सामना करत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

ही घटना गाझियाबादमधील राजनगर परिसरातील ऑफिसर्स सिटी-2 सोसायटीत घडली.सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) झियाउद्दीन अहमद यांनी सांगितले की, डॉ. हिमिका अग्रवाल या ऑफिसर्स सिटी-2 सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहत होत्या. त्यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

घटस्फोटानंतर मानसिक तणाव वाढला
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटानंतर डॉ. हिमिका अग्रवाल या नैराश्य आणि भावनिक तणावाचा सामना करत होत्या. गाझियाबादमधील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आर. चंद्र अग्रवाल यांनीही मुलीच्या मानसिक स्थितीवर घटस्फोटाचा गंभीर परिणाम झाल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे.घटना घडल्यानंतर सोसायटीतील रहिवासी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.