
मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून कोटींची कमाई केली आहे. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने 202.55 कोटींचा विक्रमी टप्पा गाठला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 76.94 टक्के इतकी होती. आर्थिक वर्ष 2026-27 मधील ही आतापर्यंतची सर्वाधिक भंगार विक्री ठरली आहे.
विविध प्रकारच्या भंगार आणि टाकाऊ साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट लावून ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करण्यात आली आहे. यात 17 हजार 755 मेट्रिक टन रेल्वे रूळ भंगार, 1,21,381 नग स्लीपर्स, 11,658 मेट्रिक टन लोहयुक्त भंगार, 1 हजार 370 मेट्रिक टन लोहयुक्त भंगार, रोलिंग स्टॉक 11 लोकोमोटिव्ह्ज (इंजिने), 33 डब्बे आणि 33 वॅगन्स यांचा समावेश होता.
भंगार विक्रीत मुंबई विभागाने सर्वाधिक कामगिरी केली आहे. मुंबई विभागात 36.78 कोटी रुपये, भुसावळ विभागात 33.19 कोटी रुपये, पुणे विभागात 27.22 कोटी रुपये, नागपूर विभागात 26.12 कोटी रुपये, सोलापूर विभागात 10.85 कोटी रुपये, इतर उत्पादन युनिट्स आणि कार्यशाळेची 68.39 कोटी रुपये अशी एकूण 202.55 कोटी रुपयांची कमाई करण्यात आली.


























































